राज्यातील साखर कारखान्यांना शरद पवारांनी दिल्या 'या' सूचना...

ऑक्सिजनची निर्मीती व पुरवठा करणेसाठी पुढाकार घ्या
राज्यातील साखर कारखान्यांना शरद पवारांनी  दिल्या 'या' सूचना...

नेवासा lतालुका प्रतिनिधीl Newasa

करोनाचे आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऑक्सिजनची निर्मीती व पुरवठा करणेसाठी पुढाकार घ्यावा असे निर्देश माजी केंद्रीय कृषी मंत्री खा.शरद पवार यांनी दिले आहेत.

खा.शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांना अनुषंगाने एक पत्र पाठविले आहे.त्यात म्हंटले आहे की, सध्या कोविडच्या दुस-या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.

कोविड पेशंटला ऑक्सिजनची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. यापूर्वी प्रत्येक आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व साखर कारखान्यांनी भरीव मदत व सहकार्य केलेले आहे. सद्य परिस्थिती लक्षात घेता संस्थेचे अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी असे निर्देशित केले आहे की, ज्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप चालू आहे व तसेच ज्यांचे सहविजनिर्मिती व आसवणी प्रकल्प कार्यरत आहेत अशा प्रकल्पांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावी.

ज्या कारखान्यांचा गाळप हंगाम संपलेला आहे अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी ऑक्सिजन किटचा पुरवठा रुग्णांना अथवा कोविड सेंटरला करावा. तसेच कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत व त्यासाठी कारखान्यांनी सध्याची साधनसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करता येईल. ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभा करावयाचे झाल्यास त्यासाठी वाफ व वीजेची गरज भासते.

साखर कारखान्यांमध्ये वाफ आणि वीज ही कारखाना चालू असताना उपलब्ध होऊ शकते. म्हणून कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारणी हाती घ्यावेत. त्याकरिता कारखान्यांना उपलब्ध साधनसामुग्री व मनुष्यबळ याचा उपयोग करता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्चसुध्दा कमी होईल. सध्याची कोविडची परिस्थिती ही भयावह असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज भासत आहे.

राज्य शासन व केंद्र शासन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहेतच, तथापि आपल्या सर्व साखर कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेऊन उपलब्ध साधनसामुग्री, मनुष्यबळ व गरज भासल्यास आवश्यक ते भांडवल घालून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. कारखान्यांना आसवणी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुध्द करण्याचा आणि कार्बन डायऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव आहे.

याठिकाणी फक्त ऑक्सिजन वेगळा करण्याचा प्रकल्प उभारण्याचे आहे. या संदर्भात व्हॅक्युम प्रेशर स्वींग अडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन यापुढे त्वरीत कार्यवाही करावी.या अनुषंगाने सर्व कारखान्यानी आपल्या कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती व पुरवठा करावा.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com