
मुंबई | Mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृतती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिकामेच होते. अखेर, राज्य सरकारने MPSC च्या अध्यक्षपदी नवीन नियुक्ती केली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांची राज्याचे पोलीस महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर, आता त्यांच्याकडे ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.
किशोरराजे निंबाळकर बुधवारी सेवानिवृत्त झाले. मात्र त्याआधीपासूनच अध्यक्ष (MPSC) नियु्क्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यावेळी सेठ यांनीही अर्ज केला होता. त्यानंतर राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेतील समितीने आलेल्या अर्जांची छाननी करून यातील तीन नावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवली होती. या तिघा नावात रजनीश सेठ, राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि वनसेवेतील ज्येष्ठ निवृ्त्त अधिकारी प्रदीपकुमार यांचा समावेश होता. अखेर सरकारने रजनीश सेठ यांच्या (MPSC Chairman) नावाला ग्रीन सिग्नल दिला. सेठ यांच्या रुपाने एमपीएससीला एक पोलीस अधिकारी अध्यक्ष म्हणून मिळाला आहे.
किशोरराजे निंबाळकर यांची नोव्हेंबर 2021 मध्ये या पदावर रूजू झाले होते. निंबाळकर (MPSC) यांचा कार्यकाळ हा पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून सहा वर्षांसाठी किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी निश्चित झाला होता. अधिसूचनेतही असेच म्हटले होते. निंबाळकर यांनी एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून 1 वर्ष 11 महिने कामकाज पाहिले. या काळात आयोगाने चांगले कामकाज केले.