
पुणे |प्रतिनिधी| Pune
उद्या (मंगळवार, दि. १५ ) पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी) सुरु होत आहे. १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत ही परीक्षा होणार असून राज्यातील १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी नऊ विभागातील एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये आठ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर सात लाख ४९ हजार ४७८ विद्यार्थिनी आहेत. एकूण २२ हजार ९११ माध्यमिक शाळांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. या परीक्षेसाठी राज्यात ५०५० मुख्य केंद्र व १६ हजार ३३४ उपकेंद्र अशा एकूण २१ हजार ४८४ ठिकाणी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. परीक्षेच्या दडपणाखाली असलेल्या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. भरारी पथके देखील परीक्षेच्या कालावधीत विविध केंद्रांना भेटी देणार आहेत.
मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्यामुळे अथवा अन्य वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन देऊ न शकल्यास अशा विद्यार्थ्यांची सदर परीक्षा ५ ते २२ एप्रिल या कालावधीत होणार आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नेहमीपेक्षा १५ दिवस उशिराने परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. माध्यमिक स्तरावर परीक्षा केंद्र, उपकेंद्र देण्यात आले आहे. ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनटे जास्त वेळ देण्यात आला आहे.