
नांदेड | Nanded
येथील विष्णूपुरीमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काल सोमवार (दि.०२ ऑक्टोबर) रोजी २४ तासात २४ मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी या रुग्णालयात येऊन पाहणी केली. यावेळी त्यांना रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसले. हे पाहिल्यानंतर खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) यांनी चक्क रूग्णालयाच्या अधिष्ठांना (डीन) स्वच्छतागृह साफ करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे...
खासदार हेमंत पाटील यांनी आज सकाळी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाची (Dr. Shankarao Chavan Government Medical College and Hospital) पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. यावेळी पाटील यांना रुग्णालयातील स्वच्छतागृह हे अतिशय घाणेरड्या स्थितीत असल्याचे दिसले. याठिकाणी अनेक शौचालय हे ब्लॉक होते, तर काही ठिकाणी स्वच्छतागृहात देखील नव्हते, असे खासदार पाटील यांच्या लक्षात आले. त्यानंतर पाटील यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) यांना रुग्णालयातील स्वच्छतागृह साफ करायला लावले.
यावर बोलताना खासदार पाटील म्हणाले की, मी डीन यांच्या कार्यालयात गेलो होता. यावेळी त्यांच्या केबिनमध्ये जे स्वच्छतागृह होते त्यापैकी एक बंद होते. तर एकामध्ये सामान भरून ठेवण्यात आले होते. बेसिन तुटले होते, पाणी नव्हते. तर बालकांच्या वार्डमधील सर्व स्वच्छतागृह गेल्या तीन महिन्यापासून बंद आहेत. त्याठिकाणी पाणी (Water) नाही, स्वच्छता नाही, कोणतीही सोय नाही. तसेच गर्भवती महिलांच्या वार्डमध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. डीन यांनी रूग्णालयात फिरले पाहिजे, परिस्थिती बघितली पाहिजे, प्रशासनाने जबाबदारीने ही कामे करायला हवी असं खासदार हेमंत पाटील यांनी म्हटले.
दरम्यान, यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालय प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (Defective Homicide) दाखल करण्याची मागणी केली. तसेच नांदेड येथील रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून ही चौकशी समिती आता रुग्णालयाची चौकशी करणार आहे. त्यामुळे चौकशी समिती येणार असल्याने शासकीय रुग्णालयातील प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.