दहा-दहा महिने पगार मिळत नाही, साखर कामगारांनी जगायचे कसे?

शरद पवार यांचा सवाल
दहा-दहा महिने पगार मिळत नाही, साखर कामगारांनी जगायचे कसे?
शरद पवार

नेवासा | तालुका प्रतिनिधी

एकेकाळी राज्यात सर्वात मोठा कापड गिरण्यांचा उद्योग होता. गिरणगाव, लालबाग भागात 120 कापड गिरण्या आणि 2 लाख गिरणी कामगार होते. यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकण भागातील संख्या मोठी होती. आज गिरणगावात फक्त एक गिरणी तीही कमी कामगारात सुरू आहे,...

मात्र साखर उद्योग अनेक आव्हानांना सामोरे जात टिकून आहे, वाढतो आहे, ही समाधानकारक बाब आहे. राज्यातील साखर कामगारांना 10-10 महिने पगार मिळत नाही, त्यांनी जगायचे कसे? आकृतीबंधा पेक्षा जास्त नोकर भरती करणाऱया संचालक मंडळाबद्दल सहकार खात्याने कडक निर्णय घेण्याची गरज आहे, असे परखड मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी व्यक्त केले.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय साखर कामगार मेळाव्या प्रसंगी शरद पवार हे बोलत होते. राज्यातील साखर कामगारांच्या वतीने 12 टक्के पगारवाढ देण्यात योगदान केल्याबद्दल कृतज्ञता सत्कार करण्यात आला.

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री हसन मुश्रीफ, खा.श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम,आ.मानसिंग नाईक, सुमनताई पाटील, अरुणअण्णा लाड, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर.पाटील, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष राऊ पाटील, उपाध्यक्ष अविनाश आपटे, अशोक बिरासदर, युवराज रणवरे, सरचिटणीस शंकरराव भोसले उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले, गरजेचे पेक्षा जास्त कामगार भरती करणाऱ्या संचालकांच्याकडून त्या कामगारांच्या पगाराची रक्कम वसूल करावी. आणि तसेच असे अमर्याद कामगार भरती करणाऱ्या संचालकांना यापुढे निवडणुकीला उभे राहता येणार नाही याबाबत कायदा करावा लागेल असा इशाराही शरद पवार यांनी यावेळी दिला. सहकार मंत्री, कामगार मंत्री, साखर आयुक्त, कामगार आयुक्त, साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांची एक तातडीने बैठक घेतली जाईल. बंद पडणाऱ्या साखर कारखान्याच्या बाबतचा आढावा घेऊन साखर कारखाने बंद पडू नयेत यासाठी कायमस्वरूपी मार्ग काढला जाईल, अशी माहिती शरद पवार यांनी यावेळी दिली.

पूर्वी खासगी साखर कारखाने होते. त्यांच्यापासून एक दृष्टी मिळाली आणि प्रवरानगर येथे पहिला सहकारी साखर कारखाना उभा राहिला. राज्यातील सहकारी साखर कारखाना चळवळ वाढविण्यात स्व.वसंतदादा पाटील, स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.राजारामबापू पाटील, तात्यासाहेब कोरे यांच्यासह अनेक धुरीणांनी योगदान केले आहे. सध्या साखर कारखान्यांची संख्या वाढताना गुणात्मक बदल होत आहेत. साखर एके साखरच्या पलिकडे जावून साखर, वीज व इथेनॉल निर्मिती केली जात आहे.साखर कामगार संघटनेच्या दिवंगत नेत्यांनी साखर कामगारांचे हित जोपासताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचेही हित पाहिले आहे. त्यांची आठवण ठेवायला हवी.

पवारसाहेब हे साखर उद्योगातील शेतकरी, कामगार आणि तोडणी मजुरासह सर्व घटकांचे आधार स्तंभ आहेत, हे जगातील पहिले उदाहरण आहे. साखर उद्योगातील कोणताही प्रश्न त्यांच्याकडे गेल्याशिवाय मार्गी लागत नाही. सध्या देशातील कामगार अस्वस्थ आहे. मात्र कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात कामगारांच्या मधून अपेक्षित तीव्र प्रतिक्रिया आलेली नाही. भविष्यात कामगार चळवळ अधिक मजबूत करीत कामगार विरोधी घटकांच्या विरोधात तीव्र संघर्ष करायला हवा

जयंत पाटील

सहकार चळवळ पुढे न्यायाची असेल,तर बरं नव्हे खरं बोलावे लागेल. नोकर भरती मुळावर उठली आहे. एखाद्या साखर कारखान्याने पॅटर्नच्या बाहेर जाऊन नोकर भरती केल्यास कामगार संघटनेने विरोध करायला हवा. तसेच सहकार खात्यानेही काही बंधने घालायला हवीत. जे साखर कारखाने चांगले चालले आहेत, त्यांनी महिन्याची महिन्याला पगार द्यायला हवा. कामगार आयुक्त तसा आदेश देतील. मात्र जे साखर कारखाने अडचणीत आहेत, त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढू.

हसन मुश्रीफ

राजारामबापू साखर कारखान्याचे वटवृक्षात रूपांतर. एके काळी चांगला साखर कारखाना पाहण्यास आम्ही सांगलीस येत होतो. मात्र तो साखर कारखाना आता सहकारी राहिला नाही. मात्र ती कमतरता जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने भरून काढली आहे. लोकनेते स्व.राजारामबापू पाटील यांनी लावलेल्या रोपट्याचे जयंतराव पाटील यांनी वटवृक्ष केला आहे. हा कारखाना राज्यातील साखर कारखान्यांच्या मार्गदर्शनाचे केंद्र बनला आहे.

यावेळी बाळासाहेब पाटील, विश्वजित कदम, पी.आर.पाटील, तात्यासाहेब काळे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रणवरे यांनी आभार मानले.

साखर कारखानदारी आणि कामगार समस्यावर तात्काळ बैठक...

सध्या एकच धंदा तोही सामूहिकरितीने टिकून आहे, तो म्हणजे कारखानदारी, तोही या साखर कामगारामुळे. मात्र बंद पडलेले साखर कारखाने हा महाराष्ट्रामध्ये नवीन प्रश्न आहे. ज्या पद्धतीने कापड गिरणी बंद पडल्या तसे हे कारखाने बंद पडू नयेत. त्यासाठी एकूण कारखानदारी आणि कामगार यांच्या समस्यावर तात्काळ बैठक लावा. एका-एका कारखान्याच्या खोलात जाऊन तो का बंद पडला, तो कारखाना पुन्हा सुरू करायला काय करावं लागेल हे पाहूया असं म्हणत कारखानदारी क्षेत्राला उर्जितावस्था देण्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

साखर कामगारांच्या मागण्या..

1) साखर कामगारांचे थकित वेतन त्वरीत देण्यात यावेत.

2) साखर कामगारांच्या पगारवाढी बाबतचे करार व त्यांची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी.

3) कामगारांच्या पेन्शन वाढीसाठी पवार साहेबांनी लक्ष घालून पेन्शन वाढीसाठी मदत करावी.

4) कायम कामगार सेवा निवृत्त होताना त्याला मिळणारऱ्या ग्र्यॅज्युटी रक्कमेत वाढ करण्यात यावी म्हणजेच एक वर्षाला कायम कामगारांना पंधरा दिवसा ऐवजी एक महिन्याच्या पगार व हंगामी कामगारांना सात दिवसा ऐवजी पंधरा दिवसांचा पगार ग्र्यॅज्युटी म्हणून देणेत यावा.

5) अनाठायी नौकर भरती टाळण्यासाठी आकृतीबंध तयार करून, पगार मध्ये नियमितता आणण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फतच अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com