आघारकर संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी पश्चिम घाट परिसरात पाणगेंद प्रजातींचा लावला शोध

या नव्या प्रजाती औषधी गुण असलेल्या वनस्पती समुहातील असल्याचा दावा
आघारकर संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी पश्चिम घाट परिसरात पाणगेंद प्रजातींचा लावला शोध

पुणे | Pune

जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा 35 जागांपैकी एक असलेल्या पश्चिम घाटात दोन नव्या औषधी वनस्पतींचा शोध लागला आहे.

या वनस्पतींना पाईपवॉर्ट म्हणजे पाणगेंद वनस्पती म्हणून ओळखले जात असून त्यांचे शास्त्रीय नाव एरिओकौलोन असे आहे. या वनस्पती केवळ मोसमी पावसाच्या काळात उगवणाऱ्या आहेत. भारतातील पश्चिम घाटात या वनस्पतींच्या 111 प्रजाती बघायला मिळतात.

यापैकी बहुतांश प्रजाती पश्चिम घाटात तर काही पूर्व हिमालयात देखील आहेत, आणि त्यातील 70% प्रजाती देशी आहेत.यापैकी एक प्रजाती, एरिओकौलोन सायनेरम मध्ये कर्करोग विरोधी, वेदनाशामक, सूजनाशक आणि स्नायू घट्ट करणारे औषधी गुणधर्म आढळले आहेत. ई- क़्विनक़्वैनग्लुएर ही वनस्पती यकृताच्या आजारांवर औषध म्हणून वापरली जाते. ई-मदईपरेन्स ही केरळमध्ये आढळणारी जीवाणूरोधी औषधी आहे. या नव्या वनस्पतींचे औषधी गुणधर्म शोधण्याचे काम अजून सुरु आहे. आघारकर संशोधन संस्था ही पुण्यातील स्वायत्त विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था असून तिने या दोन प्रजातींचा शोध लावला आहेत

पश्चिम घाटात, जैवविविधतेचा अभ्यास करतांना त्यांना या वनस्पती सापडल्या. एरिओकौलोन वनस्पतीच्या प्रजातींच्या इतिहासाचा ही संस्था शोध घेते आहे, त्यावेळी या दोन नव्या प्रजाती आम्हाला आढळल्या अशी माहिती या अध्ययनाचे नेतृत्व करणारे डॉ. रितेश कुमार चौधरी यांनी दिली. एरिओकौलोन वनस्पतीच्या प्रजाती सारख्याच दिसत असल्याने त्यांच्यातील वेगळेपण शोधून काढणे आव्हानात्मक काम असते, असेही त्यांनी सांगितले. यापैकी एक प्रजाती सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर दुसरी प्रजाती कर्नाटकच्या कुमटा भागात आढळली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com