'इनोव्हेशन टू एंटरप्राइजेस' या स्पर्धेला पुणे, अहमदनगर व नाशिक येथील संलग्न महाविद्यालयांमध्ये सुरुवात

'इनोव्हेशन टू एंटरप्राइजेस' या स्पर्धेला पुणे, अहमदनगर व नाशिक येथील संलग्न महाविद्यालयांमध्ये सुरुवात

पुणे |प्रतिनिधी| Pune

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'इन्फोफेस्ट २०२२' मधील 'इनोव्हेशन टू एंटरप्राइजेस' या नवकल्पनांना प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धेला पुणे, अहमदनगर व नाशिक येथील संलग्न महाविद्यालयांमध्ये सुरुवात झाली आहे. ३४० महाविद्यायतील प्रतिनिधींनी यात सहभाग घेतला आहे.

विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाकडून दरवर्षी 'इनोफेस्ट' या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप विषयक कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. यासाठी महाविद्यालयांमध्ये 'स्टार्टअप इनोव्हेशन सेल' स्थापन करण्यात आले आहे. यावर्षी १०० महाविद्यालये यामध्ये नव्याने जोडली गेली आहेत.

याबाबत माहिती देताना विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या, या ३४० महाविद्यालयातून प्रत्येकी २ टीम असणार आहेत. प्रत्येक टीममध्ये साधारण ३ ते ४ विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. या सर्व विद्यार्थ्यांची महाविद्यालय स्तरावर पहिली फेरी होईल. त्यानंतर त्यांच्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येईल. यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांची 'क्लस्टर लेव्हल' स्पर्धा घेण्यात येईल. त्यातून टॉप १०० टीमची निवड केली जाईल. या १०० टीमसाठी ३ दिवसीय 'बूट कॅम्प' चे आयोजन करण्यात येणार असून त्यांना संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.

त्यातून २५ ते ३० टीमचे स्टार्टअप निवडून त्यांच्यामध्ये विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा होईल त्यातून निवड झालेल्या २ स्टार्टअप टीम ला रोख पारितोषिक तर उर्वरित टीमला प्री-इंक्युबेशन प्रशिक्षण देण्यात येईल. यातील ४० चांगल्या स्टार्टअपना मार्गदर्शन तर काहींना विद्यापीठाच्या नवोपक्रम केंद्रात काम करण्याची संधी मिळेल. तसेच यांचे व्यवसायात रूपांतर होईपर्यंत या स्टार्टअपला पाठिंबा दिला जाईल असेही डॉ. पालकर यांनी सांगितले.

मागील वर्षी कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर हा फेस्टिव्हल ऑनलाइन पध्दतीने पार पडला होता. यंदा ऑनलाइन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने ही स्पर्धा पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांची क्रयशक्ती आणि त्यांच्यातील उद्योजकीय मानसिकता वाढवी या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेली महाविद्यालये या प्रेरणेतून काही उपक्रम सुरू करू शकतील असे, डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com