
पुणे(प्रतिनिधी)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राची माजी विद्यार्थिनी गौरी देवल या युवा रंगकर्मीला विविध नाटकांत उत्कृष्ट अभिनयासाठी संगीत नाटक मानाचा 'उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार' जाहीर झाला आहे. हा पुरस्कार तिला २०१९ साठी जाहीर झाला आहे.
संगीत नाटक अकादमीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त यंदा २०१९, २०२० आणि २०२१ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. संगीत, नृत्य, नाटक, परंपरागत लोककला जनजातीय कला लोकनृत्य-लोकसंगीत, नाटक आणि कठपुतळी तसेच परफॉर्मिंग आर्ट्सच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येत असतात. एका वर्षात देशभरातील ३३ कलावंतांना हे पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा एकूण १०२ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात नाट्य क्षेत्रात गौरी देवल हिचा समावेश आहे.
श्याम पेठकर लिखित व हरिश इथापे दिग्दर्शित 'रगतपिती' या मराठी नाटकापासून गौरी देवल हिचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला आहे. १९९९ मध्ये महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे पार पडलेल्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत हे नाटक पहिले आले होते आणि याच नाटकातील अभिनयासाठीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे रौप्यपदक तिला प्राप्त झाले होते. त्यानंतर तिने नागपूर. उमरेड, औरंगाबाद येथील विविध एकांकिका स्पर्धामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पुरस्कार पटकावला. त्यानंतर तिने अभिनयाचे विधिवत प्रशिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र, गुरुकुल येथे २००२ ते २००५ या काळात येथे घेतले. २००५-२००८ या काळात दिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) येथे प्रशिक्षण घेतले आणि आता ती दिल्ली येथील एका संस्थेत अभिनयाचे प्रशिक्षण देत आहे.
ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ.प्रवीण भोळे म्हणाले, हा पुरस्कार मिळवणारी गौरी ललित कला केंद्र, गुरुकुल विभागातील सहावी विद्यार्थीनी आहे. या आधी हा पुरस्कार विभागातील मनस्विनी लता रविंद्र, मुक्ता बर्वे, शर्वरी जमेनीस, सुयोग कुंडलकर आणि रुपेश गावस ह्या पाच विद्यार्थ्यांना प्राप्त झालेला आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार तसेच ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे, एसपीपीयु आलूमनी असोसिएशनचे संचालक डॉ. संजय ढोले, माजी विद्यार्थी केंद्राचे संपर्क प्रमुख प्रा.प्रतीक दामा या सर्वांनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.