औरंगाबाद l Aurangabad

करोना संसर्गामुळे महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालय नऊ महिन्यांपासून बंद असले तरी पर्यटकांसाठी गोड बातमी आहे. प्राणिसंग्रहालयातील समृद्धी या वाघिणीने शुक्रवारी पहाटे पाच बछडयांना जन्म दिला आहे.

प्राणिसंग्रहालयातील वाघांची संख्या आता १४ झाली आहे. या उद्यानात एकाच वेळी पाच बछडे जन्मण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे, असे प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले. या प्राणिसंग्रहालयात याआधी मराठवाड्यातील सर्वाधिक नऊ वाघ होते. शुक्रवारी सिद्धार्थ-समृद्धी यांच्यापासून पाच बछड्यांचा जन्म झाला. पाचही बछड्यांची प्रकृती ठणठणीत असून, त्यांना पशुवैद्यकांच्या निगरानीखाली ठेवण्यात आले आहे. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हीटर लावण्यात आले असून, सीसीटीव्ही मार्फत वॉच ठेवला जात आहे. देखभालीसाठी २४ तास केअर टेकर नियुक्त करण्यात आला आहे. पिंजऱ्यात त्याच्याशिवाय इतरांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

वाघिणीने ५ बछड्यांना जन्म दिल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.याआधी वाघिणीने २०१९ मध्ये ४ बछड्यांना जन्म दिला होता. तर सध्या करोनामुळे हे प्राणिसंग्रहालय बंद असले तरीही पर्यटकांसाठी ही खुशखबर आहे.