मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची संभाजीराजे यांच्याकडून विचारपूस; म्हणाले, “मला तुमच्या...”

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची संभाजीराजे यांच्याकडून विचारपूस; म्हणाले, “मला तुमच्या...”

जालना | Jalana

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून आमरण उपोषण सुरू केलं आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाला 40 दिवसाचा कालावधी दिला होता. परंतु, राज्य सरकारने यादरम्यान कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मराठा समाज आणखीन आक्रमक झाला असून आजपासून मराठा समाजाचं आमरण उपोषण सुरू झालं आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी या गावात जाऊन मनोज जरंगे यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण करावं, पण किमान पाणी तरी प्यावं असं छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले, “जो माणूस समाजासाठी अहोरात्र काम करतो, जो माणूस आपल्या जिवापेक्षा समाजाला मोठं समजतो, अशा लोकांना बळ आणि पाठिंबा देणं ही छत्रपती घराण्याची जबाबदारी आहे, असं मी समजतो. म्हणून मी आज उपोषण स्थळी दाखल होऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असं मी जरांगे यांना सांगू इच्छितो. आम्हाला मनापासून तुमची काळजी आहे. तुम्ही उपोषण करा, मात्र त्यादरम्यान पाणी तरी प्या, छत्रपती म्हणून मी तुम्हाला विनंती करत आहे. तुम्ही तुमच्या शब्दाचे पक्के आहात. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही मराठा समाजासाठी लढत आहात. तेव्हा देखील मी तुम्हाला भेटायला आलो होतो. त्यामुळे तुम्ही किती सच्चे आहात, हे मला माहित आहे. त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही पाणी घेऊन आमरण उपोषण करावं.”

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com