एसटी कामगारांचे वेतनही थांबले

एसटी कामगारांचे वेतनही थांबले

बेसिक पगारावर चालतोय संसाराचा गाडा

औरंगाबाद - Aurangabad :

एसटी कामगारांना वेतनासाठी पुन्हा एकदा टोहो फोडावा लागणार असल्याचे चित्र आहे. एप्रिल महिन्याचे वेतन झाले असले तरी मे महिन्याचे वेतन होईल की नाही याबाबत कामगारांना चिंता सतावते आहे.

सध्या केवळ बेसीक वेतन मिळत असल्याने कामगारांची संसाराचा गाडा ओढताना अक्षरशः फरपट होत आहे.

लॉकडाऊनच्या काळात गतवर्षी बंद असलेल्या एसटी महामंडळाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. त्याचा परिणाम कर्मचार्‍यांच्या वेतनावर झाला होता.

मात्र राज्य शासनाने विविध प्रवास सवलत मुल्यांच्या प्रतिपुर्तीपोटी थकीत रक्कम दिल्याने कसातरी वेतनाचा प्रश्न मार्गी लागला होता. आता मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने राज्य शासनाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला आहे.

त्यामुळे अत्यावश्यक सेवा सोडून इतर प्रवाशांना एसटी सेवा बंद करण्यात आली. कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वत्र पसरत असताना, जिवाची पर्वा न करता चालक-वाहकांसह अन्य कर्मचारी सेवा बजावत आहेत.

मात्र पुरेशी प्रवाशी वाहतूक नसल्याने एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने महामंडळाने कर्मचार्‍यांना पूर्ण भत्यासह वेतन न देता, बेसीक वेतन देऊन त्यांची बोळवण केली आहे. एप्रिल महिन्यापर्यंत कामगारांना त्यांचे तुटपुंजे वेतन मिळाले.

मात्र, राज्यात या दुसर्‍या लॉकडाउनमुळे बसची चाके पुन्हा थांबल्याने मे महिन्याचे वेतन मिळेल की नाही याबाबत कामगारांना चिंता सतावत आहे. वेतन मिळाले नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा, असा प्रश्न भेडसावत आहे.

अगोदरच एसटी कर्मचार्‍यांना तुटपुंजे वेतन आहे. जे वेतन आहे तेही वेळेत आणि पुर्ण मिळत नाही. इतर विभागांतील अधिकारी व कर्मचार्‍यांना वेतन वेळेत दिले जाते.

मग एसटी कर्मचार्‍यांवरच अन्याय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सद्यस्थितीत अत्यावश्यक बसफेर्‍या सुरू आहेत.

वेतन कमी असल्याने आणि पुढील महिन्यात वेतन मिळेल याची शाश्वती नसल्याने उसनवारीने दिलेल्या पैशांची परतफेड होणार नाही, असे गृहीत धरून एसटी कर्मचार्‍यांना बँक किंवा सोसायटीच नव्हे, आप्तेष्टही रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहेत. कर्मचार्‍यांनी मेडिकल बिल भरले तरी पैसे मिळत नसल्याची माहिती आहे.

बेस्टच्या सेवेला सध्याच्या घडीला चार हजार कर्मचारी आहेत. आता पर्यंत कोरोनाने 210 एसटी कर्मचार्‍यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. साडे सात हजार कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात होते. त्यातही शासनाने दिलेल्या विमा कवच देखील कुचकामी ठरले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com