आषाढी वारीचा प्रातिनिधिक फोटो
आषाढी वारीचा प्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्र

नाथांच्या पादुका मंगळवारी 'शिवशाही'ने पंढरपुरला

प्रत्येकाची होणार आरोग्य तपासणी : बस केली जाणार सॅनिटाईज

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

करोना संकटामुळे यंदा शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरपूर वारी होणार नसून ज्ञानेश्वर माऊंलींसह प्रमुख संतांच्या पादुका एसटी बसद्वारे पंढरपुरला नेल्या जाणार आहेत. संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादुका व मुख्य पुजारी शिवशाही बसमधून मंगळवारी (दि.३०) सकाळी आठ वाजता पंढरपुरकडे प्रस्थान करणार आहे.

आषाढिला चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा कुंभमेळा पंढरपुरात भरतो. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, सोपान काका, मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज यांच्यासह राज्यातील मानाचा पालख्या व त्यासोबत शेकडो मैल चालत आलेल्या वारकर्‍यांच्या दिंडयांनी पंढरपूर गजबजते. यंदा मात्र करोनामुळे वारी होणार नाही, असे राज्यशासनाने स्पष्ट केले आहे. पण मानाच्या पालख्यांची विठ्ठल भेट यात खंड पडू नये यासाठी संतांच्या पादुका हेलिकाॅप्टरने पंढरपूरला नेत शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेवली जाईल, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पण निवृत्तीनाथ महाराज मंदिराचे पुजारी पादुका नेण्यासाठी हेलिकाॅप्टर ऐवजी शिवशाही बस उपलब्ध करुन देण्याची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती. त्र्यंबकला हेलिपॅड नसल्याने वाहनाने पादुका अोझरला न्याव्या लागतील. पंढरपुरला देखील हेलिपॅड नसल्याने हेलिकाॅप्टरद्वारे पादुका सोलापूर विमानतळावर नेल्या जातील. तेथून वाहनाने पंढरपुरला पादुका नेल्या जातील.

शिवाय हेलिकाॅप्टरमधे पादुकांसोबत फक्त दोन जणांनाच सोबत जाता येईल. हे सर्व बघता हेलिकाॅप्टर ऐवजी शिवशाही बसची मागणी पुजार्‍यांनी केली होती. त्यास जिल्हाप्रशासनाने मान्यता दिली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता शिवशाही बसमधून मुख्य पुजारी व ट्रस्टचे पदाधिकारी असे २० सदस्य नाथाच्या पादुका घेऊन पंढरपुरकडे रवाना होतील. सायंकाळपर्यंत ते पंढरपुरात पोहचतील.

१ जूनला सकाळी चंद्रभागेत नाथांच्या पादुकांना स्नान घालून नगर प्रदक्षिणा मारली जाईल. द्वादशीला पंढरपुर गाभार्‍यात नाथांच्या पादुकांची भेट व दर्शन सोहळा घडेल. त्यानंतर सायंकाळी गुरुवारी सकाळी शिवशाही बसने नाशिककडे प्रयाण केले जाईल.

नाथांच्या पादुका ज्या शिवशाही बसमधून नेण्यात येतील ती बस येतांना व जातांना सॅनिटाईज केली जाईल. बसमध्ये डाॅक्टरांचे पथक सोबत असेल. तसेच पोलिस देखील सोबत असतील. सोशल डिस्टन्स पाळण्यासाठी एका सिटावर एक जण बसेल.
मंदिराचे मुख्य पुजारी, ट्रस्टचे विश्वस्त यांसह २० जण पंढरपुरला जाणार आहेत. जाण्या अगोदर प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली जाईल. येत्या मंगळवारी सकाळी आठ वाजता पंढरपुरसाठी प्रस्थान केले जाईल.
जयंत गोसावी, पुजारी श्री निवृत्तीनाथ महाराज मंदिर
Deshdoot
www.deshdoot.com