धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यातून गुजरात राज्यात जातांना प्रवाशाजवळ कोरोना विषाणूची चाचणी केल्याचा आणि ती निगेटीव्ह आल्याचा अहवाल 72 तासाचा असणे आवश्यक असल्याने प्रवाशांना अडचणी येत आहेत.

त्यामुळे प्रवाशीच प्रवास करत नसल्याने धुळे विभागातून धावणार्या बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बसेस बंद केल्यामुळे सुमारे प्रत्येक दिवशी दीड लाखांचा महसूल बुडत आहे.

गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाकडून विविध उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाणार्या प्रवाशांजवळ कोरोना विषाणूची चाचणी केल्याचा आणि ती निगेटीव्ह आल्याचा तीन दिवसापुर्वीचा (72 तास) अहवाल प्रवाशांजवळ असणे आवश्यक करण्यात आले आहे.

त्यामुळे प्रवाशांकडून हा अहवाल नवापूरपासून सहा किमी अंतरावर तपासला जातो. अहवाल नसेल तर प्रवाशांनी तेथून परत पाठवले जाते.

ही प्रक्रिया धुळ्यातून गुजरात राज्यात जातांना व गुजरात राज्यातून धुळ्यात येतांना दोन्ही वेळा केली जाते. या प्रक्रियेमुळे प्रवाशांनी प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका परिवहन महामंडळाला बसला आहे.

प्रवाशीच नसल्यामुळे धुळे विभागातून 40 बसेस रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बसेस धावत नसल्याने परिवहन महामंडळाचे एका दिवसाला दीड लाखांचे नुकसान झाले आहे.

प्रशासनाने प्रवाशांना अहवाल बाळगणे सक्तीचे केले आहे. यामुळे प्रवाशांनी गावाला जाणेच टाळले आहे. म्हणून या मार्गावर परिवहन महामंडळाच्या बसेस धावतच नाहीत. केवळ साक्री, नवापूरपर्यंतच बसेस धावत आहेत.

परंतू गुजरातची सीमा नवापूरपासून सहा किमी अंतरावर सुरु होते. तेथे प्रवाशांची तपासणी केली जाते. कोरोनाचा निगेटीव्ह अहवाल असेल तरच पुढे प्रवासाला परवानगी दिली जाते. अन्यथा परत पाठविले जाते.