माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोलेंचं निधन

माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोलेंचं निधन

माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले (Dr Madhav Godbole) यांचं आज (२५ एप्रिल) निधन झालं आहे. डॉ. माधव गोडबोले यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यातील (Pune) राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

डॉ. माधव गोडबोले यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पीएच्‌.डी. या पदव्या मिळवल्या. १९५९ साली त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला व मार्च १९९३ मध्ये भारताच्या केंद्र सरकारचे गृहसचिव व न्यायसचिव असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली.

तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून कामे केली होती. त्या अगोदर, त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या शासनात मुख्य वित्तसचिव म्हणून काम केले होते. गोडबोले हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते. याशिवाय, त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत पाच वर्षे काम केले.

सेवानिवृत्तीनंतर गोडबोले यांनी जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्‍रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, राज्याचा अर्थसंकल्प पारदर्शी व सहज समजण्याजोगा बनवण्यासाठीची एक-सदस्यीय समिती, आंध्र प्रदेश सरकारची सुशासन समिती व केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती अशा काही सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून कामे पाहिली.

ऑक्टोबर २०१९पर्यंत माधवराव गोडबोले यांनी १५ इंग्रजी आणि १० मराठी पुस्तके लिहिली आहेत. ‘चांगले प्रशासन हा मूलभूत हक्क मानला जावा ’ यासाठी त्यांनी नवी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आधारित A Quest For Good Governance (२००४) या पुस्तिकेचे ते सहलेखकही आहेत.

त्यांचे The Judiciary and Governnace in India हे पुस्तक जानेवारी २००९ मध्ये प्रकाशित झाले व त्यानंतर India's Parliamentary Democracy on Trial हे पुस्तक २०११ साली प्रसिद्ध झाले. गोडबोले यांच्या सहा मराठी पुस्तकांत मराठी नियतकालिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले लेख संकलित करण्यात आले आहेत. या संग्रहांना ललितेतर वैचारिक लेखनासंबंधी २०११ पर्यंत चार पारितोषिके मिळाली आहेत.

गोडबोले यांच्या 'जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व-एक सिंहावलोकन' या पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार प्रदान झाला. हा त्यांना मराठी पुस्तकांबद्दल मिळालेला ६वा पुरस्कार आहे.

Related Stories

No stories found.