करोना लस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल होणार - राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे

करोना लस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल होणार - राजेश टोपे

मुंबई / Mumbai - करोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी काही निर्बंध शिथील करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोविड टास्क फोर्स लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

ते म्हणाले, करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसर्‍या लाटेची चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेक गोष्टींवरचे निर्बंध ‘जैसे थ’असून धोका नसेल तर निर्बंध उठवावेत, अशी मागणी लोकांकडून होत आहे. करोनाची तिसरी लाट नेमकी कधी येणार की येणारच नाही, याचे उत्तर आपल्यावर अवलंबून आहे,

प्रशासनाने करोना बाबतीत घालून दिलेले नियम आणि निर्बंध जनतेने पाळले. कोविडपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली तर ही लाट थोपवता येऊ शकते, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी आणि त्यांच्यावरील अन्य निर्बंध उठवावेत, अशी एक मागणी होत आहे.

याबाबत विचारले असता ते म्हणाले, राज्य सरकारच्या पातळीवरही याबाबत चर्चा सुरू आहे. जसजसे लसीकरण होत आहे, तसतसे निर्बंध शिथील करण्याची राज्य सरकारची भूमिका आहेच. अजिबात निर्बंध उठत नाहीत असे नाही. पूर्वी विमानाने मुंबईत येणार्‍या प्रवाशाचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह नसेल तर त्यांना प्रवेश मिळायचा नाही. अशा प्रवाशांना थेट विलगीकरण केले जायचे. आता तसे होत नाही. लसीचे दोन डोस घेतले असतील तर त्याला प्रवेश दिला जातो.

केंद्राने लसीकरणाचा वेग वाढवावा

दोन महिन्यात राज्याचे लसीकरण 100 टक्के पूर्ण करण्याची आपली क्षमता आहे. पण त्या गतीने लस उपलब्ध व्हायला हवी. केंद्राने लसीकरणाला वेग देण्यासाठी मदत करायला हवी. जर 60 ते 70 टक्के लसीकरण झाले तर सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल. ती या संसर्गात गरजेची असल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.

सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासाची मुभा नाही

मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता प्रत्येक प्रवाशाला थांबवून त्यांच्याकडील लसीकरणाच्या प्रमाणपत्राची तपासणी करता येईल का? रेल्वेकडे तेवढे मनुष्यबळ आहे का? हे प्रश्‍न आहेत. त्यामुळे अद्याप काही निर्णय झालेले नाहीत, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com