राजकारणात अडकले ‘रेमडेसिवीर’ ; कंपनीकडे 20 लाख इंजेक्शनचा साठा पण...

मध्यरात्री विरोधी पक्षनेते फडणवीस, दरेकर पोलीस ठाण्यात ; रंगले चौकशी नाट्य
राजकारणात अडकले ‘रेमडेसिवीर’ ; कंपनीकडे 20 लाख इंजेक्शनचा साठा पण...

मुंबई - करोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनचा एकीकडे तुडवडा असताना दुसरीकडे एका कंपनीकडे 20 लाख इंजेक्शनचा साठा पडून असल्याचे समोर आले आहे. यावरुन महाराष्ट्रात जोरदार राजकारण रंगलं आहे. या राजकारणातच ‘रेमडेसिवीर’ अडकले आहे.

राज्यात रेमडेसिव्हीरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर पाच दिवसांपूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड गुजरातच्या दमनमधील ब्रुक फार्मा कंपनीत गेले होते. यावेळी त्यांनी ब्रुक फार्माच्या संचालकांना महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची मागणी केली होती. यावर संचालकांनी सांगितले की इंजेक्शनचा पुरवठा करु मात्र आम्हाला परवानगी नाही. यानंतर केंद्र सरकारमधील मंत्री मनसुख मांडविया यांच्याशी संपर्क केला आणि महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठ्यासाठी एक्सपोर्ट लायसन्स देण्याची मागणी केली. यानंतर मांडविया यांनी रेड्डीज सोबत संपर्क करुन दिला. यानंतर दोन्ही राज्यातील एफडीए कडून परवानगी मिळवली होती यामुळे टप्प्याटप्प्याने 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला मिळणार होते. ही इंजेक्शन भाजपकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेट देण्यात येणार होती असे समजते. याची कुणकुण महाविकास आघाडी सरकारला लागल्यानंतर महाराष्ट्राच्या एफडीए अधिकार्‍यांच्या पीएने कंपनीच्या अधिकार्‍यांना फोन करुन धमकावले की विरोधकांना कसे काय तुम्ही माल देत आहात आम्हाला दिला पाहिजे, असा आरोप आहे.

त्यानंतर शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन रेमडेसिवीर महाराष्ट्राला मिळू नये, म्हणून केंद्र सरकार कंपन्यांना धमकावत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजप नेत्यांनी मलिक आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. शनिवार दुपारपासून केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरू होती. दरम्यान, मलिक यांनी आक्रमक होत गुजरातमधील सर्व कंपन्यांचा माल जप्त करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कारवाई सुरू झाली.

त्यानंतर निर्यात बंदी असल्यामुळे 20 लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पडून असलेल्या ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालक राजेश डोकानिया यांना शनिवारी रात्री दहा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना मध्यरात्री विलेपार्ले पोलीस ठाण्यात आणून 45 मिनिटे त्यांची चौकशी केली. ब्रूक फार्माच्या संचालकांना ताब्यात घेतल्याचं समजल्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली. ते तासभर ठाण मांडून बसले होते. या कारवाईबद्दल पोलिसांना थेट जाब विचारला. पोलिसांनी चौकशीनंतर ब्रूक फार्माच्या संचालकांना सोडून दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले ...

महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकार्‍याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे.

एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी 10 पोलीस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. पोलीस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला. महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

डोकानिया यांच्यावर आकसाने कारवाई केल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे ब्रुक फार्मा कंपनीत दमनला गेले होते. महाराष्ट्राला रेमडेसीवीर द्या अशी विनंती केली होती. यावर कंपनीने सांगितलेले की, आम्हाला परवानगी दिली तर आम्ही आमच्याकडील साठा महाराष्ट्राला देण्यास तयार आहोत. यानुसार केंद्राला आम्ही विनंती केली की परवानगी द्यावी लागेल. यावर त्यांच्याशी टायअप करून देतो, त्यामुळे त्यांना त्यांच्या लायसनवर परवानगी मिळेल, असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले होते, असे फडणवीस म्हणाले. त्या कंपनीने जे रेमडेसीवीर इंजेक्शन बनविले होते. त्याला दमनच्या एफडीए आणि राज्याच्या एफडीएची परवानगी हवी होती. ती दिली गेली. दुपारच्यावेळी मंत्र्यांचे ओएसडी यांनी मालकाला फोन करून धमकी दिली. रात्री 9 वाजता आम्हाला मेसेज आला की 10 पोलीस त्यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून आणले. हे कसले राजकारण सुरु आहे, असा सवाल करून फडणवीस म्हणाले, आम्हाला यात राजकारण करायचे नाही. परंतू जे काही सुरु आहे ते दिसतेय. डीसीपी आता सांगत आहेत की, टीप मिळाली होती, की 60000 इंजेक्शन त्यांच्याकडे आहेत. यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतले. आम्ही त्यांना अटक करणार नव्हतो. चौकशीला बोलावले होते. राज्याला रेमडेसीवीर पाठविण्याची वेळ असताना त्या कंपनीच्या मालकाला इथे आणून बसविण्यात आले. हे कसले राजकारण आहे? जर ते सर्व परवानगी घेऊन राज्याला रेमडेसीवीर देत असतील आणि जर त्यांना अशी वागणूक दिली जात असेल तर हे चुकीचे आहे, सहन केले जाणार नाही. आता त्या व्यक्तीला पोलिसांनी सोडले आहे. आपण पोलिसांवर विश्‍वास ठेवू.

पोलिसांचे म्हणणे काय?

आम्हाला आमच्या नेटवर्कमधुन माहिती मिळाली होती की, दमणमध्ये बनवलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठा साठा मुंबईत स्टोअर करण्यात आला असून एअर कार्गोने मुंबईबाहेर पाठवणार असल्याची माहिती मिळाली होती. कोरोनावरील उपचारांमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शन किती महत्त्वाचे आहे, याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. या इंजेक्शनचा तुटवडा असून रेमडेसिव्हीरला सरकारने निर्यातबंदी केली आहे. आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही लगेच पाऊल उचलले. आम्ही फार्मा कंपनीच्या मालकाला बोलवून घेतले व साठा कुठे केला आहे? त्याबद्दल विचारले. लोकांच्या हितांच्या दृष्टीने आम्ही चांगल्या भावनेतून ही कारवाई केली असे झोन आठचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी सांगितले.

राजकारण काय?

रेमडेसिवीर इंजेक्शन विरोधी पक्षाला देण्याच्या तयारीत असलेल्या कंपनीच्या संचालकालाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने ताब्यात घेतले. भाजपातर्फे केलेली 50 हजार इंजेक्शनची मागणी पूर्ण करण्याची तयारी दर्शविणे हाच त्यांचा अपराध झाला. भारतीय जनता पक्ष पाच कोटी रुपये खर्च करून पन्नास हजार रेमडेसिवीर विकत घेणार होता. विशेष म्हणजे ही इंजेक्शन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेट देण्यात येणार होती असे समजते. याची कुणकुण महाविकास आघाडी सरकारला लागल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा बुक फार्मा कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलीसांनी अटक केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com