म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंदणी पोर्टलवर करा

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंदणी पोर्टलवर करा

मुंबई । प्रतिनिधी

करोनासह म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे सांगतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंदणी पोर्टलवर करण्याचे निर्देश दिले.

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकर मायकोसिस आजारावर मोफत उपचार करणाऱ्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिध्द करावी. करोना लढ्याला बळ देण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी तसेच गौण खनिज निधीतील रक्कम आरोग्यावर खर्चासाठी मंजूरी देत राज्यातील रुग्णालयांचे ऑक्सिजन, इलेक्ट्रिक, फायर ऑडीट तातडीने करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले.

आज मंत्रालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोनासह म्युकर मायकोसिसच्या राज्यातील परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना पवार यांनी अनेक सूचना केल्या.

म्युकर मायकोसिसच्या आजाराचे पहिल्या टप्प्यात निदान झाल्यावर तातडीने औषधोपचार सुरु केल्यास हा आजार बरा होतो. त्यामुळे या रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार सुरु करण्यात यावेत, त्यामुळे या आजारामुळे कोणाला जीव गमवावा लागणार नाही. म्युकर मायकोसिसच्या औषधांचे नियंत्रण केंद्र सरकारच्या हाती असल्याने प्रत्येक जिल्ह्यांनी म्युकर मायकोसिस रुग्णांची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करावी. त्यानुसार आपल्याला औषधांची उपलब्धता होणार आहे.

हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काही प्रमाणात म्युकर मायकोसिसच्या औषधांची निर्मिती होणार आहे. तसेच ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून या औषधांची उपलब्धता आपल्याला होणार आहे, त्यामुळे पुढील महिन्यात काही प्रमाणात या औषधांची उपलब्धता सुरळीत होऊ शकेल, असे पवार यांनी सांगितले.

ज्या गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, त्याठिकाणी सरसकट चाचण्या कराव्यात. तसेच कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी आशा वर्करना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत चाचण्या कराव्यात. ग्रामदक्षता समित्यांना अधिक क्षमतेने कार्यान्वित करावे. कडक निर्बंध असणाऱ्या जिल्ह्यात खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बी-बियाणे, खते, शेती औजारांची दुकाने शेतकऱ्यांच्या सोयीनुसार सुरु ठेवण्याचे नियोजन करावे, असे पवार म्हणाले.

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करताना ग्रामीण भागात सुध्दा कोविड सेंटर उभारण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. तसेच लहान मुलांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था आणि बालरोग तज्ज्ञांची टीम तयार ठेवावी. राज्यात सुरु असणाऱ्या ऑक्सिजन प्लॅन्टच्या उभारणीला गती द्यावी. तसेच प्रत्येक रुग्णालयात ऑक्सिजन वापराचे योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच खासगी रुग्णालयातील रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी ऑडिटरची नेमणुक करावी, अशी सूचना अजित पवार यांनी केली.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त रामास्वामी, अन्न आणो औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सभाष साळुंखे यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिकांचे आयुक्त, जिल्हाधिकारी व्हिसीव्दारे उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com