
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची भरती करण्यात येत असून राज्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी ३० हजार शिक्षकांची भरती (Recruitment of teachers) होणार असून त्यांची नावे पवित्र पोर्टलवर येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी गुरुवारी विधानसभेत दिली...
आज विधानसभेत प्रशनोत्तराच्या तासात शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक भरतीबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे, रोहित पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, डॉ. देवराव होळी, हरिभाऊ बागडे आदींनी प्रश्न विचारला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर म्हणाले, कोरोनामुळे गेल्या काही काळापासून शिक्षक भरती झालेली नव्हती. मात्र फेब्रुवारी - मार्च २०२३ मध्ये टेट परीक्षा आयोजित करण्यात आली असून याद्वारे राज्य शासन जवळपास ३० हजार शिक्षक भरती करणार आहे. विशेष म्हणजे शिक्षकांचा पदभरतीसाठी टेट परीक्षा एका वर्षात दोन वेळा घेतली जाणर आहे.
सन २०१७ नंतर आता २०२३ मध्ये टेट परीक्षा घेण्यात येत आहे. शिक्षक भरती प्रक्रियेसाठी ८० टक्के पदे भरण्याची परवानगी मिळाल्याने ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
राज्यात असलेल्या अतिरिक्त शिक्षकांना इतर ठिकाणी समायोजित करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. TET परीक्षेत दोषी ठरलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले.