आरोग्य विभागात सोळा हजार पदांची भरती

- सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
आरोग्य विभागात सोळा हजार पदांची भरती

मुंबई । प्रतिनिधी

करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी १६ हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी येथे दिली.

या १६ हजार पदांमध्ये क आणि ड वर्गातील १२ हजार कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. तर अ आणि ब वर्गातील अनुक्रमे दोन आणि ४ हजार पदे भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी तातडीने आदेश जारी करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

दरम्यान सध्या राज्यात ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि लसींच्या पुरवठ्याबाबतही केंद्राशी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लसींचा तुटवडा. . .

लसीकरणाच्या मुद्द्यावरून टोपे यांनी पुन्हा एकदा केंद्राकडून लसींचा पुरवठा होत नसल्याचे सांगितले. केंद्राकडून कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात अडचणी असल्याचे टोपे म्हणाले.

४५ वर्षावरील ज्या नागरीकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला आहे, त्यांना दुसरा डोस देण्यासाठी लस योग्य प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे राज्यात ४५ वर्षावरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नसल्याच्या तक्रार आहेत. त्यामुळे राज्य सरकार याबाबत धोरणामात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com