
मुंबई l Mumbai
रामदेव बाबा यांनी करोनावर पुन्हा एक नवं औषध लॉन्च केलं आहे. शुक्रवारी (१९ फेब्रुवारी २०२१) एका पत्रकार परिषदेत रामदेव बाबा यांनी हे औषध लॉन्च केलं.
दरम्यान पतंजलीनं तयार केलेल्या करोनील औषधावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) या औषधाविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सडेतोड भूमिका मांडली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हंटले आहे की, 'पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर 'आयएमए'ने प्रश्न उपस्थित केले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सुद्धा हे औषध करोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणं आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.' तसेच, 'जागतिक आरोग्य संघटना (WHO)आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या करोनिलच्या औषध विक्रीस महाराष्ट्र परवानगी दिली जाणार नाही.' अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
दरम्यान या औषधावर इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्षेप घेतला आहे. तसंच पतंजलीने 'कोरोनिल' या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमाणपत्र मिळाल्याचे जाहिर केले. मात्र त्यानंतर WHO ने ट्विट करत म्हंटले आहे की, 'कोविड 19 च्या उपचारांसाठी अशा कोणत्याही पारंपारिक औषधाचे परीक्षण केले नाही किंवा प्रमाणपत्रही दिलेले नाही.' याबाबत डब्ल्यूएचओनेही स्पष्टीकरण जारी केले आहे. मात्र WHO पतंजलीच्या कोरोनिलचे नाव घेतलेले नाही.