मंत्र्यांनाही ड्रेसकोड लागू केल्यास मला मंत्रालयात कसे येता येईल?

रामदास आठवलेंचा राज्य सरकारला सवाल
मंत्र्यांनाही ड्रेसकोड लागू केल्यास मला मंत्रालयात कसे येता येईल?

मुंबई -

राज्यसरकारने मंत्रालयात येणार्‍या कर्मचारी, अधिकार्‍यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबेरंगी आणि नक्षीकामवाल्या कपड्यांच्या

पोशाखास मनाई करण्यात आली आहे. अशी मनाई जर मंत्र्यांनाही लागू केल्यास मला मंत्रालयात कसे येता येईल?, असा सवाल केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील ड्रेसकोड वाद सध्या चांगलाच गाजतोय. त्यातच आता सरकारी कर्मचार्‍यांसाठीही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर केले आहेत. कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित असताना शासकीय कर्मचार्‍यांना अनुरूप ठरेल, अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत. त्यामुळे शासकीय कर्मचार्‍यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते अशा निष्कर्षाला पोहोचत शासकीय कर्मचार्‍यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या मुद्द्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला आहे.

राजकीय नेतेमंडळी म्हणजे पांढरे शुभ्र कपडे आणि डोळ्याला गॉगल अशी सुरूवातीच्या काळातील धारणा होती. त्यानंतर अलीकडे मोदी जॅकेट किंवा तत्सम पेहराव करणारी नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. काही वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील जीन्स आणि शर्ट अशा पेहरावात दिसले. पण रामदास आठवले यांना मात्र कायम रंगीबेरंगी कपड्यातच पाहायला मिळालं. त्यांनी वेगळी अशी एक ड्रेसिंग स्टाईल आहे. ते कायम रंगीत कपडे परिधान करून त्यावर एखादं जॅकेट घालून सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावतात. आपल्या रंगीत पेहरावासाठी ओळखल्या जाणार्‍या रामदास आठवले यांनी थेट ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com