मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळावे हे राज ठाकरेंचेही मत - संभाजीराजे

खासदार संभाजीराजे
खासदार संभाजीराजे

मुंबई - मराठा समाजातील गरीबांना आरक्षण मिळावे हे राज ठाकरेंचे मत असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये मराठा आरक्षण आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संवर्धनाविषयी चर्चा करण्यात आली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कामाची पद्धत वेगळी आहे. ते खर्‍या अर्थाने जात पात काही मानत नाहीत. पण गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे ते आहेत. तसेच माझी जी भूमिका आहे त्याला राज ठाकरे पाठिंबा देत आहेत. कारण राजर्षि छत्रपती शाहू महाराज म्हणजे माझे पंजोबा आणि राज ठाकरे यांचे आजोबा प्रबोधानकार ठाकरे हे दोघं जिवलग मित्र होते ते नातं आजही छत्रपती घराण्याचे आणि ठाकरे घराण्याचे आहे. त्यावरसुद्धा बरीच चर्चा झाली. दुसर्‍या विषयावर चर्चा झाली ती म्हणजे किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करणे, महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले आहेत त्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन कसे करता येईल यादृष्टिकोनातून चर्चा झाली अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती सगळ्या पक्षांच्या प्रमुखांची भेट घेऊन चर्चा करत आहेत. सकाळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तर शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही भेटणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

सगळ्या पक्ष प्रमुखांची ‘ही’ जबाबदारी -

मराठा समाज हा प्रमुख समाज आहे महाराष्ट्राचा आणि त्यांना न्याय मिळावा सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे आरक्षण रद्द केले आहे. याच्यापुढे मार्ग काय काढायचा याची जबाबदारी माझी नाही तर सगळ्या पक्षातील प्रमुखांची आहे म्हणून प्रयत्न सुरु आहे. हा कुठला भेटींचा सिलसिला सुरु नाही आहे. असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.

खासदार संभाजीराजे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांना म्हणाले...-

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये शरद पवारांना सांगितले की, मराठा समाज किती अस्वस्थ, दुःखी आहे. तसेच एकंदरीत त्यांना महाराष्ट्रातील परिस्थिती सांगितली असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते नारायण राणे यांसारख्या नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे असेही संभाजीराजे यांनी शरद पवार यांना सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com