आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन !

इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षांविना होणार अधिवेशन
आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन !

मुंबई | Mumbai

विधिमंडळाचे यावर्षीचे पावसाळी अधिवेशन उशिराने होत आहे. करोनामुळे यंदाचे अधिवेशन फक्त दोन दिवसच होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन आजपासून दोन दिवस म्हणजेच ७ आणि ८ सप्टेंबरला होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक आमदाराची करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. आमदारांना मास्क, फेस शील्ड, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज असे साहित्य दिले जाणार आहे.

आतापर्यंतची सर्व अधिवेशने विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या उपस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांमधील प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीमुळे गाजत असत. मात्र यावेळी सुरु होणारे पावसाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडेल, असे होण्याची महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. करोनाची लागण झाल्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत. करोना चाचणी निगेटिव्ह येणाऱ्या आमदारांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल. सहव्याधी असलेल्या आमदारांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी सर्वांनी हॅन्डग्लोज, मास्क लावून फिरले पाहिजे. फेस शील्ड देखील बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनामुळे एकत्र येण्याला बंधने आहेत. त्यामुळे सरकारच्या वतीने होणारा चहापानाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com