Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होणार, 'या' तारखेपासून सर्वदूर बरसणार

Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होणार, 'या' तारखेपासून सर्वदूर बरसणार

मुंबई | Mumbai

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस नाही. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. मात्र सातारा, सांगली, नगर, औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, अकोला, जळगाव या जिल्ह्यात अजून पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, राज्यात १५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १३ ऑगस्टपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. कोकण भागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार, तसेच विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. १५ ऑगस्टपासून सर्वदूर पाऊस पडणार असून मान्सूनच्या नवीन पद्धतीनुसार राज्यात कमी वेळेत अधिक पावसाच्या सरी बरसणार आहेत. जुलै महिन्याच्या अखेरीस राज्यात पाऊस पडला नाही. मात्र, शेवटच्या आठवड्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाचा जोर कमी झाला. राज्यात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत आहे, असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

दरम्यान ऑगस्टमध्ये आत्तापर्यंत राज्यात पावसाची तीव्र तूट नोंदली गेली आहे. ऑगस्टच्या १० तारखेपर्यंत राज्यात सरासरी १०० मिलिमीटर पाऊस पडतो. हा पाऊस केवळ ३७.३ मिलिमीटर नोंदला गेला आहे. १ जून ते १० ऑगस्टपर्यंतचा पाऊस लक्षात घेतला तर प्रत्यक्ष पाऊस ६४३.६ मिलिमीटर असून सरासरी पाऊस ६४१.९ मिलिमीटर असतो. त्यामुळे हा पाऊस आता सरासरीएवढाच नोंदला गेला आहे. यामध्ये रायगड, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, नांदेड या जिल्ह्यांमधील अतिरिक्त पावसाने पावसाची सरासरी गाठण्यास मदत केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com