एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली

पुणे -

येत्या 31 डिसेंबरला एल्गार परिषद भरविण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पुण्यातल्या स्वारगेट पोलीस

स्टेशनकडे अर्ज केला होता. यावर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारीला देशभरातले अनुयायी येत असतात. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

एल्गार परिषदेला संमती देऊ नये म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज केले होते. तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी घेण्यासाठी संमती द्यावी अशी मागणी केली होती. मात्र पुणे पोलिसांनी या परिषदेला परवानगी नाकारली आहे. दरम्यान,31 डिसेंबर 2017 मध्ये एल्गार परिषद शनिवार वाड्यात घेण्यात आली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी कोरेगाव भीमा येथे मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराच्या घटनेला एल्गार परिषद कारणीभूत असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली होती. एल्गार परिषदेशी संबंधीत काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास एनआयए कडे देण्यात आलेला आहे.

दरम्यान यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारीला कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे 1 जानेवारी रोजीही दूरदर्शन आणि सोशल मीडियावरुन इथे होणार्‍या कार्यक्रमाचं प्रसारण सुरु राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा घेऊ नयेत किंवा पुस्तकांचे स्टॉल्स लावू नयेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com