पुणे l Pune

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्ताने १ जानेवारी रोजी एल्गार परिषद घेण्याचे ठरले होते. परंतु, पोलिसांनी या परिषदेला परवानगी नाकारली होती. मात्र, आता एल्गार परिषदेसाठी परवानगी दिली आहे.

३० जानेवारी रोजी घेण्यात येणाऱ्या एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. या परिषदेचं आयोजन स्वारगेट येथील श्री गणेश क्रीडा कला मंच येथे करण्यात येणार आहे.

पुण्यात पुन्हा एल्गार परिषद घेण्यासाठी आयोजक निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली होती. स्वारगेट पोलिसांकडे ही परवानगी मागण्यात आली होती. त्यामुळे काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या एल्गार परिषदेला अखेर पुणे पोलिसांनी परवानगी दिली आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे केवळ २०० व्यक्तींनाच पुणे पोलिसांकडून या परिषदेसाठी परवानी देण्यात आली आहे. त्याचसोबत कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी आयोजकांना घ्यावी लागणार आहे, अशी अटही पुणे पोलिसांना घातली आहे.

ब्राम्हण महासंघाचा आक्षेप

एल्गार परिषदेच्या आयोजनावर पुण्यातील ब्राह्मण संघाने आक्षेप घेतला आहे. मागील महिन्यात राज्य सरकारने परवानगी नाकारली होती आणि आता पुन्हा परवानगी देण्यात आली. या एका महिन्यात असा काय फरक पडला, ज्यामुळे सरकारने एल्गार परिषदेला परवानगी दिली, असा प्रश्न ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे. या परिषदेला कोण वक्ते येणार आहे, या परिषदेचा उद्देश काय आहे, महिन्याभरानंतर पुन्हा ही परिषद का घेण्यात येत आहे, याची कोणतीही माहिती नाही. या परिषदेला परवानगी देण्याची कोणतीही गरज नव्हती, अशी भूमिकाच दवे यांनी मांडली. याआधीही आनंद दवे यांनी परिषदेला कडाडून विरोध केला होता.

दरम्यान, डिसेंबर २०१७ मध्ये एल्गार परिषद पार पडली होती. या परिषदेनंतर भीमा कोरेगावमध्ये दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध हा एल्गार परिषदेशी जोडण्यात आला होता. त्यामुळे डाव्या विचारांच्या अनेक दिग्गजांना अटक करण्यात आली. एल्गार परिषदेशी संबंधीत काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली होती. तसंच या प्रकरणाचा NIA कडे तपास देण्यात आला आहे.