जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर पोलिसांच्या नजरकैदेत

पुणे | प्रतिनिधि | Pune

पायी वारीवर ठाम असलेल्या जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना शनिवारी पहाटे ताब्यात घेऊन पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी पोलिसांनी वडमुखवाडी चरहोली येथे त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. पोलिसांच्या प्रयत्नाने आणि स्थानिक आमदार आणि भाजपचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या मध्यस्तीने बंडातात्या यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर ते पोलिसांच्या गाडीने पंढरपूरकडे रवाना झाले.

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर शुक्रवारी (2 जुलै) सकाळी आळंदीतील वारीत दाखल झाले होते. तसेच यावेळी नियम डावलून पायवारीला सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी बंडातात्या जिथे दिसतील तिथून त्यांना ताब्यात घ्या, असे आदेश दिले होते. त्यानंतरही बंडातात्या वारीत सहभागी झाले. सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असंही आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केलं होतं. त्यामुळे काहीसा तणाव वाढला होता.

पायी वारी साठी परवानगी द्यावी, अशी मागणी बंडातात्या यांनी केली होती. मात्र करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पायी वारीला परवानगी नाकारली. मात्र पायी वारी करणारच, अशी ठाम भूमिका घेत शनिवारी पहाटे काही वारकऱ्यांनी पायी वारी सुरू केली. त्यावेळी पोलिसांनी त्या वारकऱ्यांसह बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. पायी वारी करू नये असे समजावून सांगण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला.

कोरोना नियम डावलून पायी वारीला सुरूवात केल्यामुळे बंडातात्या यांना ताब्यात घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. बंडातात्या यांना दिघीतील संकल्प मंगल कार्यालयात अप्रत्यक्ष स्थानबद्धही करण्यात आले होते. मात्र, काल रात्रीपासूनच भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी बंडातात्यांची भेट घेतली. आज सकाळी बंडातात्या यांच्या समर्थक वारकऱ्यांनी पोलिसांची गाडी अडवली. तसेच, आम्ही पायी चालत पंढरपुरला जाणार, अशी भूमिका घेतली. मात्र पोलिसांच्या आणि आमदार महेश लांडगे यांनी काढलेल्या समजुतीमुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, आळंदी येथे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात काही वारकरी कोरणा पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे वारकऱ्यांनी आळंदी किंवा देहू येथे गर्दी करू नये, तसेच निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले होते. आळंदी आणि देहू येथे निर्बंध लागू केले असून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com