उसने दिलेले पैसे परत न केल्याने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले

उसने दिलेले पैसे परत न केल्याने मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले

पुणे(प्रतिनिधि)

उसने दिलेले पैसे परत न केल्याने चिडून आपल्याच मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील फुरसुंगीजवळ गुरुवारी घडला आहे. दरम्यान, उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यु झाला असून हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

संतोष दादाराव कागदे ( ५१, रा. भैरवनाथ मंदिरासमोर, आंबेगाव बुद्रुक) असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मनोज मोहन कांदे (२८, रा. संकेत विहार, फुरसुंगी) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कागदे आणि मनोज कांदे हे दोघे मित्र होते. मिळेल ते काम करत असत. संतोष कागदे याने मनोजकडून काही उसने पैसे घेतले होते. तो ते पैसे परत देत नव्हता. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. पैसे परत देत नसल्याने मनोज चिडला होता. आज काही तरी ‘सोक्षमोक्ष’ लावायचा या इराद्याने त्याने गुरुवारी सकाळी १० वाजता फुरसुंगीतील संकेत विहारजवळ असलेल्या एका विहिरीजवळ संतोषला भेटायला बोलविले होते. संतोष तेथे आल्यावर त्याने पुन्हा पैशाचे विचारले. तेव्हा संतोषने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने मनोजने तुला पेट्रोल टाकून जाळून खलास करतो, असे म्हणून बाटलीतून आणलेले पेट्रोल संतोष याच्या अंगावर ओतले.

काडीने पेटवून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात संतोष हे गंभीर भाजले होते. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी त्यांचा जबाब घेऊन खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, उपचार सुरु असताना सायंकाळी साडेपाच वाजता संतोष कागदे यांचा मृत्यु झाला. त्यानंतर पोलिसांनी ३०२ कलमाचा समावेश केला आहे. हडपसर पोलिसांनी मनोज कांदे याला अटक केली असून पोलीस निरीक्षक अडागळे तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.