
पुणे । प्रतिनिधी
बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत नृत्य शिकवणाऱ्या शिक्षकाने एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर परिसरात ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. सुशील राजेंद्र कदम असं आरोपी नृत्य शिक्षकाचे नाव असून तो गेल्या अनेक दिवसांपासून हडपसर भागातील मांजरी परिसरात नृत्याचे क्लास घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून पीडित मुलगी आरोपी सुशील कदम याच्याकडे नृत्य शिकण्यासाठी जात होती. तु दिसायला सुंदर आहेस, तुला चित्रपटांत काम मिळवून देतो, असं सांगत आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर फर्स्ट लूक साठी आरोपीने अनेकदा मुलीला निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय या घटनेबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलगी नृत्य शिकण्यासाठी बाहेर गेली असता बराच वेळ ती घरी परतली नाही. त्यामुळं मुलीच्या आईवडिलांनी आरोपी शिक्षकाला फोन करत मुलीला भेटण्याची मागणी केली.
त्यानंतर आरोपी सासवड येथील लॉजवर असल्याचं समजताच पालकांनी थेट घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीला रंगेहाथ पकडल्यानंतर पीडितेच्या पालकांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपी सुशील कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केली जाणार असून त्यानंतर आरोपीवर अन्य गुन्ह्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.