चंद्रकांत पाटलांच्या नावाने २५ लाखांची खंडणी; दाेघांना अटक
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांच्या नावाने २५ लाखांची खंडणी; दाेघांना अटक

मोबाइल लोकेशनवरून आरोपींचा माग

Rajendra Patil Pune

पुणे (प्रतिनिधी) |Pune -

‘चंद्रकांत पाटील यांचा पी. ए. बोलतोय’, असे सांगत रुग्णालयाकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल अरुण शेंडगे (रा. कोंढवा, पुणे), किरण धन्यकुमार शिंदे (रा. लोहियानगर, पुणे) अशी अटक केलेल्या मुख्य सूत्रधारांची नावे आहेत.यापूर्वी पोलिसांनी सौरभ संतोष अष्टूळ (वय २१, रा. गंजपेठ, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील एका नामांकित रुग्णालयात आरोपी यांनी १८ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास फोन केला होता. मी चंद्रकात दादा पाटील यांच्या कार्यालयातून दादांचा पी. ए. सांवत बोलतोय. कोरोनाच्या महामारीमुळे गरिबांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी ताबडतोब २५ लाख रूपये आमच्या पर्वतीच्या कार्यकर्त्याकडे पाठवून द्या, नाहीतर तुमचे हातपाय तोडून जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीच्या मोबाइल टॉवर लोकेशनची माहिती मिळविली. तो फोन येरवडा येथील नारळपाणी विक्रेत्याच्या मुलीचा असल्याचे समोर आले. सदरचा मोबाईल क्रमांक माझ्या वडिलांचा असून त्याचे सिमकार्ड २९ जून रोजी चोरीला गेले आहे, असे मुलीने सांगितले. संबंधित मुलगी व तिचे वडील आरोप नसल्याचे चौकशीत समोर आले.

आरोपी यांनी सदरच्या क्रमांकावरून पुण्यातील काही जणांना फोन करून त्यांच्याकडे देखील चंद्रकात दादा पाटील यांच्या कार्यालयातून बोलतो म्हणून वरील कारणाने पैशाची मागणी केल्याचे समोर आले. त्यातील एका व्यापाऱ्याला आरोपी यांना फोन करण्यास सांगून पैसे घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी आरोपी सौरभ अष्टूळ याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपी विशाल शेंडगे मुख्य सूत्रधार असून आरोपी किरण शिंदे याचाही या गुन्ह्यात समावेश असल्याचे समोर आले.

पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. मात्र आरोपी पुण्यात लपून असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला. त्यांना आरोपींशी संपर्क साधण्यास सांगून त्यांना भेटण्यास बोलाविले. भेटायला येते, असे आरोपी यांनी सांगितले. मात्र नातेवाईक व पोलिसांनी दिवसभर प्रतीक्षा करूनही आरोपी भेटायला आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून आरोपी यांचा माग काढला. त्यानंतर त्यांना गुरुवारी (दि. २३) रात्री पुणे येथून ताब्यात घेतले व निगडी पोलीस ठाण्यात आणून चौकशी करून अटक केली.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com