शहिदांच्या कुटुंबीयांना दिला जळगावातून आधार

शहिदांच्या कुटुंबीयांना दिला जळगावातून आधार

जळगाव  – 

जम्मू-काश्मीरमधील  चकमकीत शहीद झालेले  कोल्हापूरचे जवान जोतिबा चौगुले यांच्या कुटुंबीयांना 65 हजारांचा धनादेश देण्यात आला आहे. यासाठी जळगावातील आर्या फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.

जम्मू-काश्मीरमधील राजुरी सेक्टरमध्ये 16 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत कोल्हापूरचे जवान जोतिबा चौगुले हे शहीद झाले आहेत. त्यांच्या वीरपत्नी यशोदा चौगुले यांच्या नावाचा  पासष्ट हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या घरी जाऊन आर्या फाउंडेशनचे प्रतिनिधी डॉ. अजित चव्हाण, डॉ.रश्मी विजय चव्हाण ( कोल्हापूर) यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द केला.

या वेळी शहीद जवान जोतीबा चौगुले  यांचे वडील गणपती चौगुले, आई  वत्सला चौगुले, वीरपत्नी यशोदा चौगुले, सासरे पांडुरंग धुरे,  सीआरपीएफ जवान सचिन धुरे उपस्थित होते.शहीद जवान ज्योतिबा चौगुले यांना अथर्व व  हर्षद अशी दोन मुले आहेत.

डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी देखील चौगुले कुटुंबियांशी फोनवर संपर्क साधत सांत्वन केले. या आधीही राज्यातील ठिकठिकाणच्या 16 शहिदांच्या कुटुंबियांना आर्या फाउंडेशनच्या वतीने  प्रत्येकी पासष्ट हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. देशासाठी प्राणाचे बलिदान देणार्‍या शहीद जवानांच्या कुटुंबियांना आधार मिळावा व सीमेवरील जवानांचा हुरुप वाढावा, या उद्धेशाने ही मदत करीत असतो, असे डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी सांगितले..

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com