करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्या दृष्टीने तयारी करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्या दृष्टीने तयारी करा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील मोठ्या उद्योगपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत (possibility of corona third wave ) उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी बुधवारी केली.

ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे. ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची व्यवस्था करावी. त्यादृष्टीने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक असलेले सहकार्य करावे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी बोलताना ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होत असली तरी कुठेही गर्दी होणार नाही, सभा, समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

कोरोनाच्या दोन लाटेमधील हा काळ संयम आणि शिस्तीसाठी महत्वाचा आहे. या काळात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊन आपण काहीप्रमाणात आर्थिक व्यवहार सुरु करत असलो तरी अतिशय सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे. उद्योग आणि आर्थिक चळवळ सुरु राहण्यासाठी कामगारांचे येणे जाणे हे त्यांच्या कामाचे ठिकाण आणि घर इथपर्यंतच मर्यादित राहणे गरजेचे आहे, असे ठाकरे म्हणाले.

करोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतु याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण सावधगिरी बाळगून काही आर्थिक उपक्रम सुरु करत आहोत. हे करताना सावधगिरीची पाऊले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, ते कागदावर राहणार नाहीत, ते काटेकोरपणे अंमलात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पारनेर तालुक्यात जिनोम सिक्वेन्सी

पॉझेटिव्हीटी दर जास्त असलेल्या कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्हयात केलेल्या उपाययोजनांनंतरच्या स्थितीचाही ठाकरे यांनी आढावा घेतला. यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पॉझेटिव्हीटी दर तुलनेने कमी होत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच हा दर आणखी कमी करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची संख्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करून संस्थात्मक उपचाराला गती, लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जनुकिय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करून घेण्याचे निर्देशही आरोग्य विभागाला दिले.

करोनामुक्त गावांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंचांची बैठक घेऊन गाव कोरोनामुक्त होईल याची दक्षता घ्यावी. वस्ती केंद्रीत करून गाव कोरोना मुक्त करावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. बैठकीत विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सांगितल्या तसेच तिसऱ्या लाटेला परतवून लावण्यासाठी केलेली तयारीही सांगितली. तेव्हा कोरोनाला हरवण्याची तुमची जिद्द कौतुकास्पद आहे. ती कायम ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सचे पदाधिकारी, बाल टास्कफोर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com