बोगस बियाणांप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल होणार
महाराष्ट्र

बोगस बियाणांप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल होणार

Dhananjay Shinde

Dhananjay Shinde

सार्वमत

शेतकर्‍यांना भरपाई मिळवून देणार, शेतकरी लवकरच कर्जमुक्त करणार - मुख्यमंत्री

मुंबई - लॉकडाऊनच्या काळात आधीच शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असताना आता नव्या हंगामात बोगस बियाणं विकून शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍यांवर गंभीर गुन्हे दाखल होऊन शिक्षा होईल तसेच ज्यांनी हे नुकसान केलंय त्यांच्याकडून नुकसान भरपाई देखील शेतकर्‍यांना मिळवून दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकर्‍यांना दिली आहे. रविवारी जनतेशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातून मराठवाडा, विदर्भ या भागातील काही ठिकाणांवरून बोगस बियाणांबाबत तक्रारी आलेल्या आहेत. याची गंभीर दखल आपण घेतली आहे, हे दुर्दैवी आहे. शेतकर्‍यांची अवस्थाही सर्वांच्या सारखीच झालेली आहे. आपण लॉकडाऊनमध्ये घरी असताना जो शेतकरी न थकता आपल्यासाठी मेहनत करतोय, घाम गाळतोय त्या शेतकर्‍यासोबत आपण आहोत.

मी शेतकरी दादांना सांगू इच्छितो की, तुम्ही काळजी करू नका हे सरकार तुमचं आहे ज्याने ज्याने तुम्हाला फसवलेलं आहे ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत. त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून सजा तर होईलच पण तुमचं जे जे नुकसान झालं आहे, ज्यांनी ते केलं आहे त्यांच्याकडून हे सरकार तुम्हाला नुकसान भरपाई सुद्धा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

शेतात मर मर मरून, राबून शेतकर्‍यांनी जे बियाणं पेरलं ते उगवलंच नाही. त्यामुळे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलं, आता यासाठी पैसा आणायचा कुठून असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. तसंही शेतकर्‍यांच बरचंस कर्ज आपण उतरवलं आहे. तसेच कर्जमुक्ती योजनेचा फायदा घेण्यापासून स्थानिक निवडणुका, त्यानंतर करोनाच्या संकटामुळं काही लाख शेतकरी वंचित राहिले आहेत. मात्र, आता या उरलेल्या शेतकर्‍यानाही कर्जमुक्त करायचं आपण ठरवलं आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com