ठाकरी बाणा दाखवून मंत्र्याचा राजीनामा घ्या

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
ठाकरी बाणा दाखवून मंत्र्याचा राजीनामा घ्या

शिर्डी (शहर प्रतिनिधी) -

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याच्या बाबतीत जनतेच्या मनात संशय निर्माण होत आहे. मुख्यमंत्र्यांनी धाडसाने

ठाकरीबाणा दाखवून तातडीने या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलतांना दरेकर म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एका मंत्र्याच्या बाबतीत जनतेच्या मनात संशय निर्माण होत असेल आणि त्याला आधारित काही क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाले असतील तर लोकांच्या मनात आता फार काळ संभ्रम असता कामा नये, याच सरकारमधील मागे एका मंत्र्याच्या बाबतीत अशीच घटना घडली आहे.

शिवशाही सरकार असताना अण्णा हजारे यांनी मागणी करत तत्कालीन मंत्री बबनराव घोलप व शशिकांत सुतार यांचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामे घेतले होते आणि त्याच बाळासाहेबांचे सुपुत्र आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनीही धाडस दाखवावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जो पक्ष उभा राहिला आणि सत्तेत आहे. आज त्यांच्याच सत्ताकाळात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याबाबत निर्बंध लादता जातो, हे चांगले नाही.

साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळ नेमून कारभार सशक्त करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. संस्थानकडून ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. साईसंस्थानने दर्शन क्षमता वाढवली पाहिजेे. पत्रकारावर गुन्हा दाखल करणे ही बाब अतिशय निंदनीय आहे आणि त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.

ना.दरेकर यांनी शनिवारी शिर्डी येथे साईदरबारी मध्यान्ह आरतीनंतर हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी शिर्डी शहर भाजपच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक अशोक गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, रवींद्र कोते, रमेश बिडये, लखन बेलदार, नरेश सुराणा, अक्षय मुळे, आकाश आडांगळे, पंकज शर्मा आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भाजयुमोच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.

सेनेने हिंदुत्व पातळ केले

आघाडी सरकारच्या तीनही पक्षात विसंगती आहे. तीनही पक्षांना सत्ता हवी असल्याने त्यांनी विचारधारा बासनात गुंडाळली आहे. लोकांना दाखवण्यासाठी काँग्रेसने विचारधारेचा विषय पुढे करते तर राष्ट्रवादीला काही विचारधाराच नाही. शिवसेनेने हिंदुत्व पूर्णता सोडून देत ते पातळ केले आहे. त्यांना विचारधारेपेक्षा सत्ता महत्त्वाची वाटते, असा टोला ना.दरेकर यांनी लगावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com