मुंबई -

राज्यात ईडब्ल्यूएस आरक्षणासंदर्भात दोन्ही बाजूंनी बोलणारे लोक आहेत. निर्णय घेतला तरी त्याला विरोध करतात. काही मंडळींचा हा राजकीय खेळ सुरु आहे,

असा आरोप माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. मराठा समाजाला आर्थिकदृष्टया मागासवर्गात (ईडब्ल्यूएस) सवलती देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे.

रखडलेल्या प्रवेशप्रक्रिया, नोकरभरती या निर्णयामुळे मार्गी लागणार आहेत. सर्वोच्च न्यायालयातील मराठ्यांच्या ओबीसीबाबतचा निर्णय होत नाही, तोपर्यंत ठाकरे सरकारने नोकरभरती आणि प्रवेशासाठीच्या प्रक्रिया थांबवल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यास नकार दिल्याने सरकारसमोरील मार्ग खुंटले होते. खासदार छत्रपती संभाजीराजे आणि इतर काही मंडळी मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळेपर्यंत इतर निर्णय घेऊ नये, असा आग्रह धरत होते. मात्र आता केंद्र सरकारने लागू केलेले ईडब्ल्यूएस आरक्षण मराठ्यांना लागू होणार आहे.

त्यावर मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहणार, असा हल्लाबोल खासदार संभाजीराजे यांनी आज महाविकास आघाडीवर केला. संभाजीराजे पत्रकार परिषदेत बोलत होते. ईडब्ल्यूएस आरक्षण हे काही फक्त मराठ्यांसाठीच आरक्षण नाही तर ते आर्थिकदृष्या मागासवर्गीस असलेल्या तर खुल्या वर्गात येणार्या अन्य समाजासाठीही लागू आहे. आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण दिल्यामुळे एसईबीसी आरक्षणाला धोका निर्माण होणार का? असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

याबाबत प्रतिक्रिया देताना चव्हाण म्हणाले, यापूर्वी एथड च्या सवलतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, तेव्हा संभाजीराजे, मेटे आणि काही लोकांनी त्याला विरोध केला . त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय स्थगित ठेवला. मात्र एसईबीसी च्या उमेदवारांना ईडब्ल्यूएस चा लाभ मिळावा म्हणून काही जण कोर्टात गेले. हायकोर्टाने 12 ते 13 प्रकरणात ईडब्ल्यूएस चे आरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत आणि याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ईडब्ल्यूएस आरक्षणाचा कायदा आहे. त्याचा फायदा घेण्यापासून आपण कुणाला कसे रोखू शकतो? त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. मराठा आरक्षण टिकले पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठी पुढील सुनावणीच्या दृष्टीने आम्ही तयारी सुरू केली आहे.