पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी साहाय्य करणार - चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

पुणे |प्रतिनिधी| Pune

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत पुणे ग्रामीण पोलीस दलाचा आढावा घेतला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या उच्च शिक्षणासाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून साहाय्य करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीला पोलीस अधीक्षक अंकित गोयल आणि अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, यावर्षी पोलीस कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यांच्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, नर्सिंग आदी उच्च शिक्षणासाठी आवश्यक खर्चाची माहिती घ्यावी. त्यासाठी तातडीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सहकार्य करण्यात येईल. पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात येईल.

महामार्गावरील अपघाताच्यादृष्टीने धोकादायक ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) माहिती दिल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अथवा संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येतील. अपघात कमी करण्याच्या उपाययोजनांसाठी आवश्यक असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल. पोलिसांच्या वाहनांसाठी २ कोटी रुपये निधी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दुरुस्ती कामासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या संदर्भात विशेष लक्ष द्या

पोलिसांनी पुढाकार घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच्या उपाययोजना करण्यावर भर द्यावा. विशेषतः महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या संदर्भात विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी विशेष पथकाची स्थापना करावी. अंमली पदार्थांवर प्रतिबंध आणण्यासाठी कडक उपाययोजना करावी. पोलिसांना गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी आणि पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com