Bulli Bai App प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक, कशी झाली कारवाई? कसा लागला छडा?

Bulli Bai App प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक, कशी झाली कारवाई? कसा लागला छडा?

दिल्ली | Delhi

बुली बाई अ‍ॅपने (Bulli Bai App) खळबळ उडवून दिली असून मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबई पोलिसांकडूनही याप्रकरणी सध्या वेगाने कारवाई सुरु आहे. मुंबई पोलिसांनी बंगळुरु येथून २१ वर्षाच्या तरुणाला, उत्तराखंडमधून १८ वर्षांच्या तरुणी आणि २१ वर्षीय तरुण शुभम रावतला अटक केली आहे. प्रकरणावर आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale) यांनी पत्रकार परिषद घेतली. या विरोधात पोलिसांनी कशी कारवाई केली. तिघांना कसं ताब्यात घेतलं? ते देखील त्यांनी सांगितलं.

पोलीस आयुक्त हेमंत नगराळे बोलतांना म्हणाले की, बुल्ली बाई प्रकरणी तीन दिवसांपासून तपास सुरू आहे. अजून बराच मोठा तपास करण्याचा बाकी आहे. आरोपींना कुठलाही फायदा मिळू नये साठी काही गोष्टी गोपनीय ठेवण्यात आल्या आहेत. इंटरनेटवर वेब बेस्ड बुल्ली बाई नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले. विशिष्ट समाजाच्या महिलांचे फोटो साईटवर अपलोड करण्यात आले होते. त्यामधून भावना दुखावणारा संदेश या साईटवरून देण्यात आला. ३१ डिसेंबरला अ‍ॅप डेव्हलप करण्यात आले. आम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर २ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच, 'तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं वेगानं सूत्र हलवली. बुली बाई नावानं ट्विटर हॅन्डलही करण्यात आलं होतं. ही वेबसाईट जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं ही टीम काम करत होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकानं याच्या फॉलोअर्सची माहिती काढली. ही वेबसाईट फक्त पाच जण फॉलो करत होते. आतापर्यंत या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक विशाल झा, दुसरी आरोपी श्वेता सिंह, तर तिसरी आरोपी उत्तराखंड येथील आहे.' अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

दरम्यान, हा वादग्रस्त अ‍ॅप एका मोठ्या कटाचा भाग असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यामुळे याप्रकरणी अधिक सखोल चौकशी आणि तपास सुरु असून पोलिसांचं सायबर पथक याप्रकरणी पुढील शोध घेतंय. या वादग्रस्त अ‍ॅपच्या माध्यमातून महिलांच्या भावना दुखावतील असं कृत्य केलं गेल्यानं याप्रकरणातील दोषींविरोधात कठोरातली कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिला.

काय आहे नेमकं प्रकरण?

बुल्ली बाई अ‍ॅपच्या माध्यमातून सोशल मीडियात सक्रिय असलेल्या १०० महिलांना टार्गेट करण्यात आले. त्यांचे आक्षेपार्ह फोटो टाकून त्यावर बोली लावली गेली. हा धक्कादायक प्रकार समोर येताच मोठं वादळ उठलं. एका पीडित महिला पत्रकाराने याबाबत दिल्लीत तक्रार केली. तिथे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मुंबईतही पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. संबंधित युजरला ब्लॉक करून हे अ‍ॅप हटवण्यात आले आहे. त्याचवेळी याप्रकरणी आता तपासालाही वेग आला आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता असल्याने त्यादिशेनेही तपास केला जात आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावे असाही अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com