Mann Ki Baat : महाराष्ट्र टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांच्याशी पंतप्रधानांची ‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला
Mann Ki Baat : महाराष्ट्र टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांच्याशी पंतप्रधानांची ‘मन की बात’

मुंबई | Mumbai

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तसेच अनेक राज्यात ऑक्सिजनचा तुडवटा देखील होताना दिसत आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. देशभरात सुरू असलेल्या करोनाच्या संकटावर त्यांनी भाष्य केलं. करोना संयमाची परीक्षा घेत आहे. आपले अनेक सहकारी, नातेवाईक आपल्याला सोडून गेले आहेत. हा धैर्य आणि संयमाचा क्षण आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

पंतप्रधानांनी डॉ. शशांक जोशी यांच्याशी चर्चा केली. डॉ. जोशी देशातील सर्वोत्तम डायबेटोलॉजिस्ट, पद्मश्री आणि राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य आहेत. पंतप्रधानांनी लोकांच्या मनातील काही शंका उपस्थित केल्या. यावेळी करोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दलची मतं जाणून घेतली. त्याचबरोबर लोकांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेतली.

यावेळी डॉक्टर शशांक जोशी म्हणाले की, 'करोनाची ही जी दुसरी लाट आली आहे, ती खूप वेगानं आली आहे आणि पहिल्या लाटेपेक्षा विषाणुच्या संसर्गाची गति जोरात आहे. परंतु, त्याच्या संसर्गापेक्षाही जास्त गतिनं लोक बरे होत आहेत आणि मृत्युदरही खूप कमी आहे, ही याच्याबाबतीत दिलासादायक गोष्ट आहे. या लाटेबाबत दोन-तीन फरक आहेत. पहिल्यांदा करोनाचा संसर्ग युवक आणि मुलांमध्येही थोडा दिसून येत आहे. त्याची जी श्वास लागणं, कोरडा खोकला येणं, ताप येणं ही पहिल्या लाटेसारखी लक्षणं तर आहेतच, परंतु त्याबरोबर वासाची जाणिव नष्ट होणं, चव न लागणं हीही आहेत. आणि लोक थोडे घाबरले आहेत. खरंतर लोकांनी घाबरण्याची अजिबात गरज नाहि. ८० ते ९० टक्के लोकांमध्ये याची कोणतीही लक्षणं दिसत नाही.'

डॉ. जोशी पुढे म्हणाले की, 'हल्ली एक नवीन प्रयोगात्मक औषध ज्याचं नाव रेमडिसिवीर आहे. त्याच्या वापरामुळे रूग्णाचा रूग्णालयात रहाण्याचा कालावधी दोन ते तीन दिवसांनी कमी होतो आणि क्लिनिकल रिकव्हरीमध्ये त्याची मदत होते. आणि हे ही औषध पहिल्या नऊ ते दहा दिवसात दिलं तरच काम करतं आणि पाचच दिवस ते देता येतं. परंतु असं पाहिलं गेलं आहे की, लोक रेमडेसिवीरच्या मागे धावत सुटले आहेत. असं मुळीच धावता कामा नये. हे औषध थोड्या प्रमाणातच काम करतं.'

तसेच, 'ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, ते रूग्णालयात दाखल होतात. परंतु डॉक्टर सांगतील तेव्हाच बाहेरून प्राणवायु घेतला पाहिजे. लोकांनी हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आपण प्राणायाम केला, आपल्या शरिरातल्या फुफ्फुसांना जरासं विस्तारित केलं, आणि शरिरातलं रक्त पातळ करणारी जी इंजेक्शन्स येतात, ती घेतली, या छोट्या छोट्या औषधांनीही 98 टक्के रूग्ण बरे होतात. शिवाय, लोकांनी सकारात्मक रहाणंही खूप आवश्यक आहे. उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घेणं अत्यंत आवश्यक आहे. या महागड्या औषधांच्या मागं धावण्याची काहीच गरज नाही असे देखील डॉ जोशी यांनी यावेळी सांगितले.

आपल्याकडे जगातले सर्वात उत्कृष्ट उपचार उपलब्ध आहेत, हे स्पष्ट करून डॉ जोशी म्हणाले की, 'भारतात रूग्ण बरे होण्याचा सर्वात चांगला रिकव्हरी रेट आहे. आपण युरोप किंवा अमेरिकेशी तुलना केली तर आमच्याकड़े रूग्ण उपचारांच्या नियमावलीनुसार बरे होत आहेत.' या माहितीबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले.

पंतप्रधान पुढे बोलतांना म्हणाले, करोनाविरोधी लढाई जिंकण्यासाठी लस महत्त्वाची आहे. लसीकरण महत्त्वाचं आहे. पण लसीबाबत नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. केंद्र सरकारकडून राज्यांना लसीचा मोफत पुरवठा केला जात आहे. करोनाच्या या संकटात केंद्र सरकार राज्यांना मदत करण्यासाठी आपल्या सर्व शक्तींचा उपयोग करत आहे, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

देशात करोनावरील लसीकरण मोहीम सुरू आहे. या लसीकरण मोहीमेत खासगी क्षेत्रानेही सहभाही व्हावं. खासगी क्षेत्रातील उद्योगांनी आणि कंपन्यांनी आपल्या कर्माचाऱ्यांचे लसीकरण करावे. तसंच मोफत लसीकरणाच्या फायद्यांबाबत राज्यांनी जनजागृती करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी, असं आवाहन मोदींनी केलं.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com