पिंपळनेर येथे धाडसी घरफोडी : पावणेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास
महाराष्ट्र

पिंपळनेर येथे धाडसी घरफोडी : पावणेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास

Balvant Gaikwad

पिंपळनेर, ता. साक्री येथील कन्हैय्या नगरात बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी पावणे तीन लाखांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. याबाबत पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, कन्हैय्या नगरात कार्तिक चिंतामण साबळे हे त्यांच्या आईसह राहतात. तर त्यांचे वडील राहुरी येथे नोकरीला आहेत. दि. 22 डिसेंबर रोजी कार्तिक आपल्या आईसह राहुरी येथे गेलेले होते.

त्या दरम्यान चोरट्यांनी घराच्या कंपाऊंडच्या गेटचे कुलूप तोडून मुख्य दरवाजा तोडला. त्यानंतर घरातील कपाट उघडून 90 हजाराची रोकड, 72 हजारांच्या सोन्याच्या बांगड्या, 36 हजाराची मंगल पोत, 24 हजारांची लहान पोत, 24 हजारांच्या कानातील रिंगा, 30 हजाराची अंगठी असा दोन लाख 76 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला.

कार्तिक साबळे हे दि. 23 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता घरी परत आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पिंपळनेर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे हे त्यांच्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. याबाबत पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com