मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव

मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव

पुणे |प्रतिनिधि| Pune

जगभरात चिंता निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन विषाणूने मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये शिरकाव केला आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये ६ तर पुणे शहरात १ असे सात रुग्ण ओमायक्रॉनने बाधित झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे.

दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून आपल्या भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षीय महिला, तिच्या सोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली असे एकूण ६ जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यामध्ये ओमायक्रॉन विषाणू सापडल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आज संध्याकाळी दिला आहे. तसेच पुणे शहरातील ४७ वर्षीय पुरुषाला देखील या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या अहवालाने सिध्द झाले आहे.यामुळे महाराष्ट्रातील ओमायक्रॉन विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या आता ८ झाली आहे. या सहा जणांपैकी ३ जण नायजेरियाहून आले आहेत तर इतर तिघे त्यांचे निकटसहावासित आहेत.

नायजेरियाची नागरिक असणारी भारतीय वंशाची ४४ वर्षांची महिला तिच्या १२ आणि १८ वर्षांच्या दोन मुलींसह आपल्या भावाला भेटण्यासाठी दिनांक २४ नोव्हेंबर २०११ रोजी पिंपरी चिंचवड येथे आली. त्या तिघींना ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचे आता सिध्द झाले आहे.या तिघींच्या १३ निकटसहवासितांची तपासणी करण्यात आली असून त्यातील या महिलेचा ४५ वर्षाचा भाऊ आणि त्याच्या अनुक्रमे दीड वर्षे आणि ७ वर्षांच्या दोन मुली या कोविड बाधित आल्या होत्या. या तिन्ही निकटसहवासितांमध्ये देखील ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. नायजेरियाहून आलेल्या महिलेची आजाराची लक्षणे अत्यंत सौम्य असून इतर ५ जणांना कसलीही लक्षणे नाहीत.

या सहा जणांपैकी तिघे हे १८ वर्षाखालील असल्याने त्यांनी कोणतीही लस घेतलेली नाही. उर्वरित तिघांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. दोघांनी कोविशिल्ड तर एकाने कोवॅक्सिन ही लस घेतलेली आहे. हे सर्व रुग्ण सध्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात भरती असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

पुणे शहरातील ओमायक्रॉन बाधित रुग्ण नेहमीच्या सर्वेक्षणात आढळला असून हा रुग्ण १८ ते २५ नोव्हेंबर २०२१ या काळात फिनलंड येथे गेला होता. २९ तारखेला थोडासा ताप आला म्हणून त्याने चाचणी केली असता तो कोविड बाधित आढळला. त्यामे कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले असून सध्या त्यांना कोणतीही लक्षणे नसून प्रकृती स्थिर आहे.

दरम्यान, विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून या बाबत जनतेने भीती बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com