पिस्तुल विक्री करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

19 लाख 89 हजार रुपये किंमतीची 42 पिस्तुलं आणि 66 जिवंत कडतुसे जप्त
पिस्तुल विक्री करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

पुणे (प्रतिनिधी) - पिस्तुल विक्री करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट -4 ने केला आहे. त्यांच्याकडून 19 लाख 89 हजार रुपये किंमतीची 42 पिस्तुलं आणि 66 जिवंत कडतुसे जप्त केली आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार हा मध्यप्रदेशमधील आहे. तर राज्यातील 26 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 15 जणांना मुख्य सुत्रधारासह अटक करण्यात आल्या आहेत.

अटक केलेल्यांची नावे अशी गणेश मारुती माळी, गोटू उर्फ ज्ञानोबा गीते, मनिसिंग गुरमुख सिंग भाटिया, आकाश वाघमोडे, योगेश विठ्ठल कांबळे, तुषार बवकर, योगेश जगदीश, योगेश उर्फ आबा तावरे, कुश नंदकुमार पवार, चेतन उर्फ मामा लिमन, अक्षय दिलीप केमकर, प्रसन्न पवार, प्रकाश उर्फ पप्पू किसन मांडेकर, सिराज सलीम शेख, प्रगेश नेटके

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात पोलीस नाईक लक्ष्मण आढारी यांना मिळालेल्या माहितीवरून आरोपी गणेश माळी याच्याकडून एक पिस्तुल हस्तगत केले होते. गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडे चौकशी केली असता हस्तगत केलेले पिस्तुल हे बीड जिल्ह्यातील परळी येथे राहणार्‍या ज्ञानबा उर्फ गोटू मारुती गीते याच्याकडून घेतल्याचे त्याने सांगितले. या गुन्ह्यात गोटू गीते याला पोलिसांनी अटक केली. दोघांकडून एकूण 6 पिस्तुल आणि 15 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. अधिक तपास केला असता गोटू गीते याने मध्यप्रदेश येथील धार जिल्ह्यातून सरदार नावाच्या व्यक्तीकडून पिस्तुलं आणली होती अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.

त्यानंतर गुन्हे शाखा युनिट 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख व पोलीस शिपाई प्रशांत सैद यांनी मध्यप्रदेश येथे एक पथक पाठविले. तिथे जाऊन अधिकारी कर्मचारी यांनी वेशांतर करून पिस्तुल खरेदी विक्रीची सविस्तर माहिती काढली. प्रकरण गंभीर असल्याने वरिष्ठ अधिकार्‍याना याची माहिती देण्यात आली आणि अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. मध्यप्रदेश येथील ग्राम सिंघाना, थाना मनावर, जी-धार येथे दोन दिवस वेशांतर करून तळ ठोकून मुख्य आरोपी मनिसिंग गुरमुख सिंग भाटिया ताब्यात घेऊन, त्याच्याकडून 11 गावठी पिस्तुल 22 जिवंत काडतुसे हस्तगत केली गेली. दरम्यान, सदर आरोपीचा साथीदार कालूसिंग जसवंत सिंग याने महाराष्ट्रातील कुश नंदकुमार पवार रा. तळेगाव दाभाडे, ज्ञानेश्वर पवार रा.शिरगाव, आकाश उर्फ बाळा जगन्नाथ वाघमोडे, योगेश विठ्ठल कांबळे रा. उस्मानाबाद, गोटू उर्फ ज्ञानबा मारुती गीते या टोळी प्रमुखांना मोठ्या प्रमाणात पिस्तुल विक्री केल्याचं समोर आले. त्यांना देखील तातडीने अटक करण्यात आली.

यातील आरोपी कुश पवार आणि प्रसन्न पवार यांनी मध्यप्रदेश येथून 29 पिस्तुलं आणून गुन्हेगारांना विक्री केली आहेत. त्यातील कुश पवार, प्रसन्न पवार, प्रकाश मांडेकर, सिराज शेख, यांना अटक करून त्यांच्याकडून 18 पिस्तुल आणि 22 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तसेच आकाश उर्फ बाळा जगन्नाथ वाघमोडे आणि योगेश विठ्ठल कांबळे या टोळी प्रमुखांनी मध्यप्रदेश येथून 27 पिस्तुल आणून आरोपींना विकले त्यातील अक्षय दिलीप केमकर 28, योगेश तावरे 24, चेतन लिमन 28, प्रज्ञेश नेटके, मयूर घोलप, विकी अनिल घोलप, राजू भाळे, सोमनाथ रमेश चव्हाण यांच्याकडून 7 पिस्तुल आणि 7 जिवंत काडतुसे व शस्त्र आणण्यासाठी वापरलेली मोटार जप्त केली आहे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com