मुंबईत जम्बो कोविड सेंटरला मान्यता

- विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबईत जम्बो कोविड सेंटरला मान्यता

मुंबई । प्रतिनिधी

मुंबईत भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ट्विट करून दिली.

महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती केली होती. ही विनंती मान्य केल्याची माहिती देत फडणवीस यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानले आहेत.

या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्याची तयारी बीपीसीएलने दर्शविली आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेडस येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर्स भरून देण्याची तयारी दाखवली. यामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com