कालबद्ध वेळेत फायर ऑडिट करा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी; विरारच्या दुर्घटनेबद्दल व्यक्त केले दुःख
कालबद्ध वेळेत फायर ऑडिट करा

मुंबई । प्रतिनिधी

विरार येथे हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत लोकांचे प्राण जाण्याची घटना ही अतिशय धक्कादायक असल्याचे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूरमध्ये बोलताना कालबद्ध कार्यक्रम आखून राज्यभरातील रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याची मागणी केली.

एकिकडे कोरोनाचे भय आणि त्यात अशा घटनांनी भय आणखी वाढते आहे. दरवेळी चौकशी करू असे सांगितले जाते, ती झाली पाहिजे. फायर ऑडिट करू, असे सांगितले जाते. पण, तेही होताना दिसत नाही. भंडारा, नागपूर, नाशिक, मुंबई आणि आता विरार या घटना अतिशय गंभीर आहेत. अशा घटनांच्या मुळाशी जात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी आता पुढच्या काळात खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

विरार येथील घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करीत फडणवीस म्हणाले की, कोरोनाची लढाई अशा घटनांनी आणखी कठीण होऊन जाते. संबंधित विभागांनी यासाठी स्वत: पुढाकार घेऊन एका ठरविक कालावधीत सेफ्टी ऑडिटची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही घटना राष्ट्रीय महत्त्वाची नाही, असे म्हटल्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, टोपे यांनी कोणत्या मानसिकतेतून हा राष्ट्रीय मुद्दा नाही, असे सांगितले हे मला माहिती नाही. पण असे वक्तव्य करणे हा असंवेदनशीलपणा असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com