धक्कादायक । जन्मदात्यांकडून लेकीची हत्या
महाराष्ट्र

धक्कादायक । जन्मदात्यांकडून लेकीची हत्या

Balvant Gaikwad

आंतरजातीय प्रेमसंबंधाचा राग

दुसर्‍या समाजातील मुलाशी प्रेमसंबंध असल्यामुळे जन्मदात्या आई-वडिलांनी अल्पवयीन मुलीचा खून केला. खुनाच्या दोन दिवसांनंतर पोलीस तपासातून ‘ऑनर किलिंग’ची ही घटना उघड झाली. दरम्यान, मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांसमोर खुनाची कबुली दिली आहे. या घटनेमुळे तळवेल गावात खळबळ उडाली आहे.

तळवेल येथील रहिवासी सुधाकर पाटील यांची मुलगी निकिता (वय 17.5) हिला गावातीलच गणेश निवृत्ती राणे (वय 25) या युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले होेेते. दीड वर्षांपूर्वी तरुणीच्या आई- वडिलांना त्याची कुणकुण लागली होती. त्यावेळी त्यांंनी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना सोबत घेऊन वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

त्या गुन्ह्यात गणेशला भुसावळ न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा दिली होती. यानंतरही गणेश निकिताच्या मागे लागला होता. सालदारकी करणार्‍या सुधाकर पाटील यांनी अल्पवयातच निकिताचा विवाह खामखेडा (ता.मुक्ताईनगर) येथील मुलासोबत ठरवला. येत्या 26 फेब्रुवारी रोजी हा विवाह होणार होता.

गणेशला त्याची माहिती मिळाल्यामुळे त्याने हा विवाह होऊ द्यायचा नाही, यासाठी बालविवाह कायद्यांतर्गत भुसावळ न्यायालयात अर्ज केला होता. त्यानंतर न्यायालयाकडून दोन्ही कुंटुबांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. यामुळे निकिताचे आई वडील हतबल झाले. 19 फेब्रुवारी रोजी (बुधवारी) रात्री निकिता गाढ झोपेत असताना तिचे नाक, तोंड व गळा दाबून खून केला.
मुलीचे वडील मुलाच्या काकाकडे सालदार निकिताचे वडील गणेशच्या काकाकडे गेल्या काही वर्षांपासून सालदारकी करत होते. दोघांची घरे जवळजवळ होती. त्याचा गरीबीचा फायदा गणेशने घेऊन निकिताला फूस लावली होती. त्यांना निकितासह दोन मुली व दोन मुले होते.

अशी मिळाली तक्रार

बुधवारी निकिताचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह घरातच पडून होता. निकिताचा मृत्यू झाल्याची माहिती काही लोकांना कळली. त्यांनी पोलीस पाटील ज्ञानदेव पाचपांडे यांना ही माहिती दिली. पाचपांडे यांनी वरणगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली.

शवविच्छेदनातून उलगडले रहस्य

निकिताचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. त्यावेळी डॉ.क्षितिजा हेंडवे यांना तिच्या चेहरा व अंगावर संशयास्पद ओरबाडण्याच्या खुणा व जखमा आढळल्या. मृतदेहाचे जळगाव येेथे सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचा निर्णय पो.उ.नि. संदीपकुमार बोरसे यांनी वरीष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून घेतला. जळगावात झालेल्या शवविच्छेदनात निकिताची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी खाक्या दाखवताच आई-वडिलांची कबुली

निकिताचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तिच्या आई-वडिलांची कसून चौकशी केली. त्यावेळी निकिताच्या आईने आपण पाय दाबून ठेवले व तिच्या वडिलांनी गळा दाबल्याची कबुली दिली.

गणेशने निकिताच्या बालविवाहाची तक्रार न्यायालयात नोंदवल्याने समाजात बदनामी होऊ नये, म्हणून तिला ठार मारल्याचे सांगितले. यामुळे पोेलिसांनी निकिताचे वडील सुधाकर मधुकर पाटील (वय 46) व आई नंदाबाई सुधाकर पाटील (वय 40, रा.तळवेल) यांच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम 302, 34, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2007 कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल केला. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे, हे.काँ.मुकेश जाधव करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com