
पालघर | Palghar
वडराई-शिरगाव रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या केंद्राच्या जवाहर नवोदय विद्यालयात (Jawahar Navoday Vidyalaya) अकरावीच्या विद्यार्थ्यांकडून दहावीतील ३५ विद्यार्थ्यांना शिक्षेच्या रूपात मारहाण (35 Students Beaten up by) करून रॅगिंग करण्यात (Ragging)आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
या मारहाणीमध्ये एका विद्यार्थ्याचा कानाचा पडद्याला इजा झाली असून सहा दिवसांपूर्वी घडलेल्या या प्रकाराबद्दल विद्यालय प्रशासनासाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
अकरावीतील सहा ते सात विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता उदयगिरी हाऊसमध्ये दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांना बोलवून घेतले. तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत, असे सांगून सर्वांना बोलावले गेले. तिथे सर्व विद्यार्थी गेल्यावर त्यांना सूचना देण्यात आल्या, जे विद्यार्थी विद्यालयात उशिरा आले त्यांना उभे राहा असे सांगण्यात आले. उशिराने आलेल्या विद्यार्थ्यांना उभे करून त्यांच्या कानावर विद्यार्थ्यांचा गुप्तांगावर गुडघ्याने मारण्यात आल्याचे ही विद्यार्थ्यांनी सांगितले.
इतकेच नाही तर दहावीतली मुले शर्ट इन करत नाही, बूट घालत नाही, तसेच मेसमध्ये मोठमोठ्याने आवाज करतात अशी कारण देत विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. नियम फक्त आम्हीच पाळायचे का? असा सवाल दहावीच्या विद्यार्थ्यांना विचारण्यात आला. ३० सप्टेंबरला रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान म्हणजे तब्बल एक तास हा प्रकार सुरु होता. महाविद्यालय प्रशासनाला याची जराही भनक नव्हती. रात्री बारानंतर सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेलवर त्यांच्या-त्यांच्या रुममध्ये पाठवण्यात आले.
एका विद्यार्थ्यांचा कान जास्त दुखू लागल्याने विद्यालयातील नर्सकडे गेले असता कानाला झालेली दुखापत बघून नर्सने मुलांच्या आई वडिलांना बोलावून घ्या आणि डॉक्टरांकडे त्याची तपासणी करा, असे सांगितले. यावेळी पालक विद्यार्थ्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासणीनंतर कोणी मारलेय का? काही झालेय का? असे प्रश्न विचारले. तेव्हा विद्यार्थ्याने घडलेला सगळा प्रकार उघड केला. दरम्यान, पुन्हा असा प्रकार घडू शकतो, या भीतीपोटी विद्यार्थ्यांनी या प्रकाराबाबत पालकांना कळवले नव्हते, असे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.
रक्त येईपर्यंत मारहाण
विशाल कुशवाह व सुशांत सोनकर या विद्यार्थ्यांच्या गालावर आठ ते नऊ वेळा जोरजोरात मारण्यात आले. यात विशालचा कान सुजला होता. तर सुशांत सोनकर त्याच्या नाकातून रक्त येईपर्यंत त्याला मारहाण करण्यात आली. कौस्तुभ मोरे यालाही जबर मारहाण करण्यात आल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली असून, अहवाल प्राप्त झाल्यास दोषी विद्यार्थ्यांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल. त्याचा रिपोर्ट तयार झाला की, इनडोअर समिती त्याच्यावर निर्णय घेईल आणि दोषी विद्यार्थ्यांवर नक्कीच कारवाई करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य इब्राहम जॉन यांनी दिली आहे.