काला दहीहंडी फोडुन नाथषष्ठी उत्सवाची सांगता, मंदिर परीसरात वारकऱ्यांचा जल्लोष

काला दहीहंडी फोडुन नाथषष्ठी उत्सवाची सांगता, मंदिर परीसरात वारकऱ्यांचा जल्लोष

पैठण | प्रतिनिधी

काला अष्ठमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी सूर्यास्त समयी पैठण येथील बाहेरील नाथ समाधी मंदिरात नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज गोसावी यांच्या हस्ते काला दहीहंडी फोडुन तीन दिवसीय नाथषष्ठी यात्रा उत्सवाची सांगता करण्यात आली. तसेच नाथसंस्थानच्या वतीने नाथमंदिराबाहेर डोममध्ये रोहयोमंत्री तथा नाथमंदीर संस्थानचे अध्यक्ष संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत ह.भ.प केशव महाराज उखळीकर यांचे किर्तन झाले.

काल्याच्या किर्तनानंतर उखळीकर यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाहेरील नाथ समाधी मंदिर परिसरात जागा अपुरी असल्याने राज्यभरातुन आलेल्या वारकरी, भाविकांना काला दहीहंडी सोहळ्याचा आनंद घेता येत नव्हता. त्यामुळे नाथमंदीर संस्थानचे अध्यक्ष तथा मंत्री संदीपान भुमरे यांनी दोन वर्षापासून मंदिराबाहेर कालादहीहंडी फोडण्याचा सोहळा सुरू केला. हा सोहळा बघण्यासाठी हजारो वारकरी, भाविक, गर्दी करतात आणि प्रत्यक्ष काला प्रसादाचा लाभ घेतात.

यावेळी राज्याचे रोहीयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, मुख्याधिकारी संतोष आगळे, तहसीलदार दत्तात्रय निलावाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल, पोलीस निरीक्षक किशोर पवार, नाथसंस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार संजय वाघचौरे, नंदलाल काळे, रवींद्र काळे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, ज्ञानेश्वर कापसे, शिवसेना शहरप्रमुख तुषार पाटील, पवन लोहीया, शहादेव लोहारे आदी मान्यवरासह मोठ्या संख्येने भाविक हजर होते.

दुपारी तीन वाजता पंरपरेनुसार गावातील नाथ वाड्यातुन नाथ वंशजाची मानाची दिंडी वाळवंट मार्गाने सांयकाळी बाहेरील नाथ समाधी मंदीरात दाखल झाली. यावेळी महाराजासह वारकरी, भाविकांनी भानुदास-एकनाथांचा जयघोष, टाळमृंदगावर ठेका घेत सातपावली, खेळत आनंद साजरा केला. तीन दिवस सोहळ्यात सहभागी झालेल्या शेकडो दिंड्या व वारकरी, भाविकांनी आज शुक्रवारी काला अष्ठमीच्या मुहूर्तावर सकाळ पासून आपआपल्या फडावर किर्तन करत काला दहिहंडी फोडुन काल्याच्या प्रसादाचा लाभ घेत वारकरी, भाविकांनी घराकडची वाट धरली. खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, विणा, पखवाज घेऊन आम्ही जातो आमुच्या गावा। आमुचा रामराम घ्यावा।। असे अभंग गात वारकऱ्यांनी पैठण देव नगरीचा निरोप घेतला.

Related Stories

No stories found.