करोना आकड्यांची बनवाबनवी थांबवा - विरोधी पक्षनेते फडणवीस यांची मागणी

मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
करोना आकड्यांची बनवाबनवी थांबवा - विरोधी पक्षनेते फडणवीस यांची मागणी

मुंबई । प्रतिनिधी

मुंबईतील करोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करीत करोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी चित्र उभे करणे आणि त्यातून करोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता करोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोविडसंदर्भातील नोंदी ठेवण्यासंदर्भात जागतिक पातळीवर जागतिक आरोग्य संघटना आणि भारताच्या बाबतीत आयसीएमआर यांनी निश्चित अशी नियमावली आखून दिली आहे. या नियमावलीप्रमाणे कोविडच्या कारणामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा कोविडचाच मृत्यू म्हणून नोंदवायचा आहे. मात्र मुंबईतील मृत्यूदर अथवा सीएफआर कमी दाखविण्यासाठी नेमका किती भयंकर प्रकार होतो आहे, हे स्पष्टपणे दिसून येते. उर्वरित महाराष्ट्रात एकिकडे अन्य कारणांमुळे होणारे मृत्यू नोंदण्याचे प्रमाण ०.७ टक्के असताना, मुंबईत मात्र कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेदरम्यान हे प्रमाण ३९.४ टक्के इतके आहे, असे फडणवीस यांनी ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

करोनाच्या या दुसर्‍या लाटेत मुंबईतील संसर्ग दर कमी व्हावा, यासाठी कमी चाचण्या करण्याचा प्रयत्न मुंबई महापालिकेच्यावतीने सातत्याने होतो आहे. मुंबईसारख्या शहरात जेथे आरटीपीसीआर चाचण्यांची क्षमता किमान एक लाख इतकी आहे, तेथे केवळ सरासरी ३४ हजार १९१ इतक्याच चाचण्या प्रतिदिन केल्या जात आहेत. आणि त्यातही ३० टक्के या रॅपीड अँटीजेन प्रकारातील आहेत, असे फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

रॅपीड अँटीजेन कमी केल्या तर संसर्ग दर वाढतो आणि त्या वाढविल्या तर संसर्गाचे प्रमाण कमी होते. मात्र संसर्ग कमी होतोय हे दाखविण्यासाठी चाचण्या सुद्धा नियंत्रित केल्या जात आहेत. कमी चाचण्यांमुळे संसर्गाचे प्रमाण तर वाढतेच, शिवाय मृत्यूदरही वाढतो. परंतु अशापद्धतीने बनवाबनवी केली जात असल्याने कोरोनाचे वास्तविक चित्र जनतेपुढे येत नाही. याशिवाय, अन्य कारणामुळे होणारे मृत्यू असे दाखवून त्यांचे कोविड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार न केल्यास त्यातून अकल्पित अशा असंख्य संकटांना वेगळेच तोंड द्यावे लागेल, अशी भीती फडणवीस यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com