मुंबईत मृत्यूंची संख्या दडवण्याचे काम- विरोधी पक्षनेते फडणवीस

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
मुंबईत मृत्यूंची संख्या दडवण्याचे काम- विरोधी पक्षनेते फडणवीस

मुंबई । प्रतिनिधी

मुंबईच्या घाटांवर रोज होणारे अंत्यसंस्कार आणि रोजची दिली जात असलेली मृत्यूसंख्या याचा कुठेही ताळमेळ बसत नसून मुंबईत मृतांची संख्या दडवली जात असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला.

मुंबई सारखीच परिस्थिती राज्यांतील अन्य जिल्ह्यांत आहे. गेल्या काही दिवसांत जुने मृत्यू नोंदविण्याच्या प्रक्रियेमुळे राज्यात अवघ्या सात दिवसांत ४ हजार ४६०मृत्यू नोंदण्यात आले . राज्यातील एकूण कोरोनाबळींच्या संख्येत एकट्या मुंबईत २० टक्के मृत्यू आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्याच्या कोणत्याच भागाकडे दुर्लक्ष परवडणारे नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

राज्यातील कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना चाचण्या आणि त्यातही आरटीपीसीआरचे प्रमाण वाढविण्याची सूचना फडणवीस यांनी सरकारला केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

मुंबईत गेल्या आठ दिवसात कोरोनाच्या अतिशय कमी चाचण्या झाल्याचे सांगताना फडणवीस यांनी पत्रात १९ एप्रिलपासूनची आकडेवारी नमूद केली आहे. मुंबईत केवळ ४० हजार प्रतिदिन चाचण्यांनी शहराचे नेमके चित्र लक्षात येणार नाही. त्यातून कोरोना स्थिती हाताळणे भविष्यकाळात पुन्हा कठीण होऊन बसेल. आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांच्या प्रमाणाचा विचार केला तर राज्यात जवळजवळ ४० टक्के चाचण्या या अँटीजेन पद्धतीने होत आहेत.

२६ एप्रिल रोजी नोंदलेल्या मुंबईतील २८ हजार चाचण्यांमधील ४० टक्के अँटीजेन चाचण्या गृहित धरल्या तर केवळ १६ हजार ८०० आरटी-पीसीआर चाचण्या मुंबईत होत आहेत. इतक्या कमी संख्येत जर आरटीपीसीआर चाचण्या होत असतील तर मुंबईचे नेमके चित्र डोळ्यापुढे येऊच शकणार नाही. एकूणच कमी चाचण्या आणि त्यातही कमी आरटीपीसीआर चाचण्या हे अजिबात परवडणारे नाही,असे फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

मुंबईत तर चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढवाव्याच लागतील, शिवाय राज्याच्या अन्य भागात सुद्धा ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हे तत्त्व काटेकोरपणे पाळण्याची गरज आहे. त्यातही केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे आरटीपीसीआर चाचण्यांचा पुरेसा समतोल राखण्यात यावा, असे देवेेंद्र फडणवीस यांनी सूचवले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com