मुंबई

अहिराणी भाषेचे संवर्धन होऊन जगाला अहिराणी भाषेचा गोडवा आणि सामर्थ्य याची माहिती करून देण्यासाठी आणि अहिराणीचा प्रसार करण्याच्या दृष्टीने प्रथमच विश्व अहिराणी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन दि २६ ते २८ डिसेंबर असे तीन दिवस समाज माध्यम आणि ऑनलाईन पद्धतीने होईल.

उत्तर महाराष्ट्र विकास मंडळ आयोजक असलेले हे संमेलन भारतीय प्रमाण वेळेनुसार तिन्ही दिवस रोज सायंकाळी ४ ते ६.३० व सायंकाळी ७.०० ते ९.३० अशा दोन भागात संपन्न होणार आहे.

प्रथमच आयोजित करण्यात येत असलेल्या या विश्व अहिराणी संमेलनात जगभरात विखुरलेल्या खान्देशी आणि अहिराणी बोली भाषा जाणणाऱ्या रसिकांना सहभागी होता यावे यासाठी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाने टेलीग्राम, फेसबुक, इन्स्टाग्राम, यु ट्युब व व्टिटर लिंकची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या समाजमाध्यमांतून सहभागी रसिकांना अपडेट्स मिळणार आहेत.

या संमेलनात खान्देशची अहिराणी भाषा, परंपरा, संस्कृती, इतिहास, खाद्यसंस्कृती, कृषी, भौगोलिक माहिती, पर्यटन, पर्यावरण इत्यादी विषयांवर देश विदेशातील मान्यवर खान्देशी मार्गदर्शन करतील. यात रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, पाच पद्मश्री पुरस्कार विजेते, जवळपास १५ डॉक्टरेट तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.

प्रथमच होणाऱ्या या विश्वव्यापी संमेलनाचा जगभर विखुरलेल्या समस्त खान्देशवासियांनीच नव्हे तर सर्व मराठी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

संमेलनाच्या अध्यक्षपदी बापूसाहेब हटकर, स्वागताध्यक्षपदी विकास पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप अहिरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे स्वरूप पुढील प्रमाणे असणार आहे.

१) वैश्विक प्रतिभासंगम

२) चावय ( परिसंवाद )

३) तोंडेतोंड( मुलाखत)

४) गप नही ते गफूडा (कथा कथन)

५) यावर कोन ध्यान दी का?

६) कविता वट्टा

७) नृत्य

८) नाट्य

९) संगीत

१०) चित्रकला

११) पर्यटन

१२) लोककला

१३) संस्कृतीन्या वाटा

१४) मनोगत मयफल

१५) शिल्पकला

१६) शिल्पकार