नवउद्योजकांना वर्षभरात देणार शंभर कोटी रूपये

नवउद्योजकांना वर्षभरात देणार शंभर कोटी रूपये

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी

अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना येत्या वर्षभरात शंभर कोटी रूपये मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.

त्यातील 133 नवउद्योजकांना आठ दिवसांत 12. 98 कोटीचा मार्जिन मनी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

मंत्रालयात सामाजिक न्याय विभागातील 133 नवउद्योजकांना मार्जिन मनी मिळणे बाबत व सामाजिक न्याय विभागाच्या लघुउद्योजक यांच्यासाठी असलेल्या योजना बाबत आढावा बैठकीत मुंडे बोलत होते.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, लीडकॉमचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गेडाम, डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, संतोष कांबळे,रवी घाटे, डिक्कीचे सदस्य ,अनेक लघुउद्योगाचे प्रतिनिधी व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मुंडे म्हणाले, अनुसूचित जातीतील नवउद्योजकांना कोणत्या प्रकाराचे लघुउद्योग सुरू करता येतील त्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, आर्थिक सहाय्य यांचा कृतीआराखडा तयार करण्यासाठी विभागाचे सचिव ,समाजकल्याण आयुक्त,डिक्कीचे प्रतिनिधी, लीडकॉमचे प्रतिनिधी तसेच बँकर्स यांची संयुक्त समिती स्थापन केली आहे.

समिती कृतीआराखडा तयार करून पुढील बैठकीत अहवाल सादर करेल. जिथे कच्चा माल उपलब्ध असेल तिथे त्याचे उत्पादन करून मोठ्या महानगरात बाजारपेठ उपलब्ध करणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबतही प्रयत्न केला जाईल.

15 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंतचे लघुउद्योग सुरू करण्यासाठी 15 टक्के मार्जिन मनी वितरीत करण्यात येईल. तालुकास्तरावर नवउद्योजकांमार्फत सेवा व उत्पादन पुरविणारी साखळी निर्माण करून त्यातूनच हे नवउद्योजक तयार करणार आहे, डिक्कीच्या सहकार्याने अनुसूचित जातीसाठी आर्थिक विकासाच्या योजना राबवण्यात येऊन अनुसूचित जाती चा आर्थिक व सामाजिकस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

तसेच डिक्की व लीडकॉम यांच्या सहकार्याने चर्मोद्योगाला चालना देणार आहे. स्टॅड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना लवकरच विशेष आर्थिक पॅकेज देणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत NOGA, MAIDC, BVG, A Store ,लीडकॉम शॉपी ,ले धारावी या लघुउद्योग कंपन्यांनी आपले सादरीकरण सादर केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com